सूरतमधील एका खासगी रुग्णालयात एका नवजात बाळाचं ब्रेन डेड झालं. यानंतर बाळाच्या पालकांनी मुलाचे अवयव दान करण्याचा मोठा निर्णय घेतला. जीवनदीप ऑर्गन डोनेशन फाऊंडेशनच्या माध्यमातून पाच दिवसांच्या बाळाचे अवयव दान करण्यात आले. जन्मानंतर काही तासांतच अवयव दान करणाऱ्या मुलांमध्ये ही भारतातील पहिली आणि जगातील दुसरी घटना आहे. मुलाचे अवयव संबंधित रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
सूरतच्या वालक पाटिया परिसरातील गीतांजली रो हाउसमध्ये राहणारे हर्ष भाई संघानी यांच्या घरी 13 ऑक्टोबरला दुपारी एका मुलाचा जन्म झाला. बाळाचे काका व्रज संघानी यांनी सांगितले की, जन्मापासूनच मुलाच्या शरीरात कोणतीही हालचाल होत नव्हती. तो रडलाही नाही. केअर चिल्ड्रन हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी सांगितले की, मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल. व्हेंटिलेटरवर ठेवल्यानंतरही प्रकृती बरी होऊ शकली नाही. बाळाचं ब्रेन डेड झाला होतं. हे कळल्यावर आमच्या संपूर्ण कुटुंबाला खूप दुःख झाले.
डॉक्टरांनी तेव्हा सांगितलं की, ब्रेन डेड बाळाचे अवयव दान केले जाऊ शकतात. यानंतर मुलाची आजी आणि कुटुंबीयांनी मुलाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. अवयवदान करून आपण एखाद्याला नवजीवन देऊ शकतो. पाच दिवसांच्या बाळावर बालरोगतज्ज्ञ डॉ.अतुल सेलडिया यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. मुलाला वाचवण्यासाठी 72 तास प्रयत्न करण्यात आले, मात्र यश आले नाही. यानंतर मुलाला ब्रेन डेड घोषित करण्यात आले.
डॉक्टरांनी मुलाच्या कुटुंबीयांना अवयवदानाबद्दल सांगितल्यावर कुटुंबीयांनी होकार दिला. पाच दिवसांच्या मुलाचे अवयव दान केल्यास इतर पाच ते सहा मुलांना जीवनदान मिळू शकते. डॉक्टरांनी पीएम गोंडालिया आणि जीवनदीप ऑर्गन डोनेशन फाऊंडेशनचे विपुल तलाविया यांना मुलाच्या अवयवदानाबद्दल सांगितले. यानंतर मुलाचे अवयव दान करण्यात आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.