आंध्रप्रदेश सरकारमध्ये असणार पाच उपमुख्यमंत्री; 'यामुळे' घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 01:11 PM2019-06-07T13:11:45+5:302019-06-07T13:14:28+5:30
लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने आंध्रप्रदेशमधील १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवला. तर लोकसभेच्या २५ पैकी २२ जागांवर विजय मिळवला.
नवी दिल्ली - आंध्रप्रदेशात तेलगू देसम पक्षाला पराभूत करून जगमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वातील वाएसआर काँग्रेसने मोठा विजय मिळवला. त्यानंतर जगमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र आता आंध्रप्रदेश पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारणही तसंच आहे, देशात प्रथमच एखाद्या राज्यात पाच उपमुख्यमंथ्यांची नियुक्ती होणार आहे.
जगमोहन रेड्डी यांनी राज्यात पाच उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तेत सर्व जातींना समान संधी मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाचे आमदार मुस्तफा साईक म्हणाले की, आंध्रप्रदेश सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री असणार आहे. एससी, एसटी, मागास, अल्पसंख्यांक आणि कापू समुदायीतील प्रत्येकी एकाला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीसोबत झालेल्या विधानसभा निवडणुकीत वायएसआर काँग्रेसने आंध्रप्रदेशमधील १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवला. तर लोकसभेच्या २५ पैकी २२ जागांवर विजय मिळवला. तर अभिनेता पवन कल्याण यांच्या पक्षाला एका जागेवर विजय मिळविण्यात यश आले. २०१४ मध्ये टीडीपीने १०२ जागांवर विजय मिळवून सरकार स्थापन केले होते. तर वायएसआर काँग्रेसला ६७ आणि भाजपला ४ जागा मिळाल्या होत्या.