हैदराबाद : आंध्रप्रदेशमध्ये जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर कॉँग्रेस सरकारने ५ उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागास, अल्पसंख्याक व कापू समुदायातून (कृषक समाज) प्रत्येकी एक-एक उपमुख्यमंत्री नियुक्त केला जाईल.
२५ जणांचे भरगच्च कॅबिनेट मंत्रीमंडळही असणार आहे. या निर्णयामुळे रेड्डी नवा उच्चांक प्रस्थापित करतील. मुख्यमंत्र्याच्या मते, सत्तेमध्ये सर्व जातींचे संतुलन राखण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे. वायएसआर कॉँग्रेसचे आमदार एम.एम. शायक म्हणाले की, आम्ही या निर्णयामुळे प्रसन्न आहोत. आंध्र प्रदेश मध्ये ५ उपमुख्यमंत्री असतील. या निर्णयामुळे हे सिध्द होईल की, रेड्डी आतापर्यंतच्या देशाच्या इतिहासातील सर्वात चांगले मुख्यमंत्री असतील.
रेड्डी जमातीचा मंत्रिमंडळात सिंहाचा वाटा असेल, अशी अटकळ होती. मात्र ताज्या निर्णयामुळे क्रांतीकारक पाऊल पडले असून संबंधित जातीजमातींमध्ये खुषीची लहर पसरली आहे.
चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारमध्ये यापूर्वी कापुसमुदायाचा आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील एका आमदारास उपमुख्यमंत्रीपदी संधी देण्यात आली होती.
दुर्बल घटकांना प्राधान्यया राज्यात विधानसभेच्या १७५ पैकी १५१ जागांवर वायएसआर कॉँग्रेसने शानदार विजय मिळविला आहे. शनिवारी एका समारंभात मंत्रिमंडळाची स्थापना केली जाईल. वायएसआर कॉँग्रेसच्या आमदारांची बैठक शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झाली. त्यावेळी त्यांनी पाच उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला.
मंत्रिमंडळातही प्रामुख्याने दुर्बल घटकातील लोकप्रतिनिधींचा समावेश असेल, असे त्यांनी सांगितले. रेड्डी म्हणाले की,सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर मंत्रिमंडळात अडीच वर्षांनी फेरबदल केले जातील.