मुंबई, दि. ३- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण खात्याची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवून नवा इतिहास रचला आहे. सीतारामन यांच्यापुर्वी पंतप्रधान इंदिरा गांधी १९७५ साली २० दिवसांसाठी व १९८० ते ८२ अशी दोन वर्षे या पदावरती होत्या मात्र फक्त संरक्षण खात्याची पूर्ण जबाबदारी असलेल्या पहिल्या महिला मंत्री होण्याचा मान सीतारामन यांनी मिळवला आहे. भारतीय उपखंडात महिला मंत्र्याला संरक्षण खाते मिळणे फारसे नवे नाही. १९६० साली श्रीलंकेत सीरीमावो बंदारनायके या जगातील पहिल्या महिला संरक्षणमंत्री म्हणून काम करु लागल्या. १९६० ते १९६५ अशी पाच वर्षे त्यांनी काम पाहिले नंतर पुन्हा १९७० ते १९७७ अशी सात वर्षे त्या संरक्षणमंत्रीपदावरती होत्या. हा कित्ता त्यांची मुलगी चंद्रिका कुमारतुंगा यांनीही गिरवला. चंद्रिका १९९४ ते २००१ इतका प्रदिर्घ काळ श्रीलंकेच्या संरक्षणमंत्री होत्या , या काळात श्रीलंकेत तमिळ वाघांमुळे यादवीही माजलेली होती. पाकिस्तानमध्ये बेनझीर भुट्टो १९८८ ते १९९० या दोन वर्षांसाठी संरक्षणमंत्री होत्या.बांगलादेशात १९९१ पासून संरक्षणमंत्रीपद महिलेकडेच आहे. बेगम खालिदा झिया यांनी बांगलादेशात संरक्षणमंत्री होण्याचा सर्वात प्रथम मान १९९१ ते ९६ या काळासाठी मिळवला. त्यानंतर पाच वर्षे शेख हसिना वाजेद या पदावर होत्या. पुन्हा पाच वर्षे झिया संरक्षणमंत्री झाल्या व २००९ पासून गेली ८ वर्षे शेख हसिना पुन्हा संरक्षण मंत्रालय सांभाळत आहेत. यानंतर नेपाळमध्ये विद्यादेवी भंडारी यांनी २००९ ते २०११ अशी दोन वर्षे संरक्षणमंत्रीपदी काम केले आहे. याबरोबरच सध्या दुबईला पळून गेलेल्या थायलंडच्या माजी पंतप्रधान यिंगलुक शिनावात्रा एका वर्षासाठी संरक्षणमंत्रीपद सांभाळत होत्या. आशियाई देशांत हाँगकाँग, फिलिपाइन्समध्येही महिला संरक्षणमंत्री होत्या. तसेच डाँमिनिका, निकाराग्वा,फिनलंड, कँनडा, नाँर्वे, झिम्बाब्वे, चिली, बहामा, फ्रान्स, क्रोएशिया, कोलंबिया, स्वीडन, सेनेगल, बेलिझ, गिनिआ बिसू, उरुग्वे, अर्जेंटिना, लँटविया, केप वर्दे, जमैका, झेच रिपब्लिक, इक्वेडोर, मादागास्कर, स्पेन, स्लोवेनिया, डेन्मार्क, बोटस्वाना, बोलिविया, जाँर्जिया, गँबन, लिथुआनिया, द.आफ्रिका, माँटेनेग्रो, पँराग्वे, नायजेरिया, नेदरलँडस, केनया, व्हेनेझुएला, अल्बानिया, जर्मनी, आँस्ट्रलिया या देशांमध्येही संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी महिलांनी सांभाळली आहे .