माणूसकी हरवत चाललीय; जाळ्यात अडकलेल्या बिबट्याला शिजवून खाल्लं!
By स्वदेश घाणेकर | Published: January 24, 2021 01:27 PM2021-01-24T13:27:29+5:302021-01-24T13:36:06+5:30
आरोपीच्या घरातून १० किलो मांस व बिबट्याच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्र पोलिसांनी जप्त केली
वन्यप्राणी आणि मनुष्य यांच्यातला संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या संघर्षात माणूसकी हरवत चालल्याचेही पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत शिरलेल्या हत्तीच्या शरिरावर पेटता टायर फेकण्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यात त्या हत्तीचा मृत्यूही झाला. तामिळनाडूतील या घटनेनंतर केरळमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घराजवळच्या शेतात टाकलेल्या जाळ्यात अडकलेल्या बिबट्याला ( Leopard) शिजवून खाण्याचा लज्जास्पद प्रकार उघडकीस आला आहे.
केरळमधील (Kerala) इडुकी येथे घराजवळच्या शेतात टाकलेल्या जाळ्यात बिबट्या (Leopard) अडकला. पण, याबाबतची माहिती वन विभागाला न देता पाच जणांनी त्याला ठार केलं आणि त्यानंतर त्याचं मासं शिजवून खाल्लं. या प्रकाराची माहिती समजताच पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. वन विभागानं दिलेल्या माहितीनुसार विनोद, कुरिकोस, बीनू, कुंजप्पन आणि विन्सेट अशी या आरोपींची नावे आहेत. यापैकी विनोदच्या शेतामधील जाळ्यात हा बिबट्या अडकला होता. त्यानंतर त्याने या सर्वांना बोलावून बिबट्याला ठार मारलं आणि त्याचं मांस शिजवून खाल्लं.
वन विभागानं या प्रकरणाची माहिती मिळताच आरोपीच्या घरी धाड टाकली आणि तेव्हा विनोदच्या घरातून १० किलो मांस व बिबट्याच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्र पोलिसांनी जप्त केली. बिबट्याची दातं, नखं व कातडे विकण्याचा या सर्व आरोपींची योजना होती. या आरोपींची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. वन विभागच्या कायद्यानुसार आरोपींना सात वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.