पंचकुला - डेरा हिंसा प्रकरणाचा तपास करणा-या विशेष तपास पथकाने (एसआयटी) गुरमीत राम रहीमची दत्तक मुलगी हनीप्रीत आणि खासगी सचिव राकेश कुमार यांची कसून चौकशी केली. रविवारी करण्यात आलेल्या या चौकशीत हिंसेप्रकरणी अनेक प्रश्न दोघांना विचारण्यात आले. एसआयटीचे डीसीपी मनबीर सिंह यांनी चौकशीसंबंधी अधिक माहिती दिलेली नाही. मात्र डीजीपी बीएस संधू यांनी यासंबंधी काही माहिती दिली असून, नवी आणि अधिक माहिती हाती आल्याचा दावा केला आहे. आरोपींना जेलमध्ये पाठवण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी माहिती शेअर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, पंचकुलामधील सेक्टर-23 पोलीस स्थानकात एसआयटीने जवळपास पाच तास हनीप्रीतची चौकशी केली. पाच तासांच्या चौकशीनंतर हनीप्रीत आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगू लागली. यानंतर एसआयटीने आपली चौकशी थांबवली. हनीप्रीतला एका अज्ञातस्थळी नेण्यात आलं.
शनिवारी राकेश कुमारला न्यायालयात हजर केलं असता, पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढवण्यात आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डेरा हिंसामध्ये हनीप्रीतने महत्वाची भूमिका निभावल्याची कबुली राकेशने दिली आहे. हनीप्रीतने हिंसा करण्यासाठी पुर्ण योजना आखली होती. हिंसेमुळे 30 जणांचा मृत्यू झाला होता, तसंच सार्वजनिक संपत्तीचं मोठं नुकसान झालं होतं.
हनीप्रीतची चौकशी करण्यासाठी न्यायालयाकडून मिळालेल्या सहा दिवसांची रिमांड मंगळवारी संपत आहे. यामुळे पोलीस लवकरात लवकर पंचकुला हिंसेच्या कटाची माहिती बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान 25 ऑगस्ट रोजी पंचकुला येथे दंगल झाल्यानंतर पुढील 38 दिवस हनीप्रीत नेमकी कुठे होते, तिला पैसे कुठून मिळाले याची माहितीदेखील पोलिसांना मिळवायची आहे.
पंचकुला पोलिसांनी शुक्रवारी सांगितलं होतं की, 25 ऑगस्ट रोजी राम रहीमला बलात्काराची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर झालेल्या हिंसेत हनीप्रीतचा हात होता. न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी पोलीस पुरावे गोळा करत आहेत. हनीप्रीतची नार्को टेस्ट केली जाण्याचाही शक्यता आहे.
मागच्या महिन्याभरापासून फरार असलेल्या हनीप्रीत इन्साने अखेर 3 ऑक्टोबर रोजी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. ती हरियाणा पोलिसांच्या ताब्यात आहे. हनीप्रीत बाबा गुरमीत राम रहीमची दत्तक मुलगी आहे. राम रहीम साध्वींवरील बलात्कार प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. हनीप्रीतने आत्मसमर्पण करण्याआधी माध्यमांना मुलाखती दिल्या. त्यात तिने आपली बाजू मांडली.
राम रहीम आणि ती पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा तिने केला. वडिलांबरोबर आपल नातं पवित्र असल्याचं हनीप्रीतने या मुलाखतीत सांगितलं. हनीप्रीतचा पूर्वपती विश्वास गुप्ताने हनीप्रीतचे राम रहीमबरोबर अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. मी राम रहीम आणि हनीप्रीतला एकत्र नेकेड, सेक्स करताना बघितले होते असे विश्वास गुप्ताने पत्रकार परीषदेत सांगितले होते.