श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांशी ५६ तास चाललेल्या चकमकीत लष्कर-ए-तयब्बाचे दोन जण, सीमा सुरक्षादलाच्या (सीआरपीएफ) अधिकाऱ्यासह पाच सुरक्षादल कर्मचारी व एक नागरिक ठार झाला. सुरक्षादलांकडून ही कारवाई कुपवाडाच्या बाबागुंड भागात झाली.सुरक्षादलांसाठी हा भाग अत्यंत कठीण समजला जातो. शुक्रवारी सकाळी सुरू झालेल्या चकमकीत दोन अतिरेकी मारले गेले. पोलिसांनी सांगितले की लष्कर ए तयब्बाशी संबंधित या अतिरेक्यांचे मृतदेह चकमकीच्या ठिकाणी हाती लागले. दोन अतिरेक्यांपैकी एक जण हा पाकिस्तानचा आहे. दुसऱ्याची ओळख पटवली जात आहे. सीआरपीएफचे जवान शाम नारायण सिंह यादव हे शुक्रवारी चकमकीत जखमी झाले होते त्यांचा रविवारी मृत्यू झाला. यामुळे सुरक्षादलाच्या मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या पाच झाली आहे. सीआरपीएफचे निरीक्षक पिंटू आणि कॉन्स्टेबल विनोद आणि सिलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबल नसीर अहमद आणि गुलाम मुस्तफा बाराह यांचा शुक्रवारी चकमकीत मृत्यू झाला. वसीम अहमद मिर हा नागरिकही बंदुकीची गोळी लागून जखमी झाला होता. त्याचा रुग्णालयात शुक्रवारी मृत्यू झाला. बाबागुंड भागात अतिरेकी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलांनी शुक्रवारी सकाळी त्या भागात त्यांचा शोध सुरू केला होता. अतिरेकी लपले होते तो भाग खूपच दाटीवाटीचा व अडचणींचा आहे. चकमकीच्या ठिकाणाहून तेथील घरांत राहणाºयांना हलवण्यात आले होते.
काश्मीरमध्ये चकमकीत पाच जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 4:40 AM