दंतेवाडा: छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील जंगलांचा भाग असलेल्या भागात नक्षलवाद्यांनी भू-सुरुंगचा स्फोट घडवून सशस्त्र दलाचे वाहन उडवून लावले. त्यात सशस्त्र दलाचे पाच जवान आणि जिल्हा पोलीस दलाचे दोघे असे सात जण शहीद झाले असून, एक जवान जखमी झाला आहे. जवानांच्या जीपलाच नक्षलवाद्यांनी टार्गेट केल्याने त्यातून वाचणे त्यांना शक्य झाले नाही.दंतेवाडा जिल्ह्यातील छोलनार आणि किरंडूल गावांच्या परिसरात पोलीस व सशस्त्र दलाचे जवान एकत्रपणे नक्षलवाद्यांचा शोध घेत असताना, हा स्फोट घडवून आणण्यात आला. त्यासाठी प्रचंड क्षमतेची स्फोटके वापरण्यात आली होती. त्यामुळे जीपमधील सातपैकी पाच जण जागीच मरण पावले, तर आणखी दोन जवानांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दोघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात हलवले होते. त्यांनी शस्त्रेही पळवून नेलीजवानांचे वाहन या स्फोटात पार जळून खाक झाले. या स्फोटांत जवान मरण पावल्यानंतर त्यांच्याकडील सर्व शस्त्रे नक्षलवाद्यांनी पळवली.जवानांकडील चार इन्सास रायफली व एक एके-४७ रायफल ही शस्त्रे गायब झाल्याचे पोलिसांनी मान्य केले.
दंतेवाडामध्ये नक्षली हल्ल्यात सात जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2018 1:03 PM