आंध्र प्रदेश: आंध्र प्रदेशातील कोरापूरच्या पडुवा जंगलात सुरक्षा रक्षक आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्याचे समजते. खात्मा करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. चकमकीदरम्यान सुरक्षा रक्षकांनी नक्षवाद्यांकडून शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या सीमेवर कोरापूरजवळील जंगलात काही नक्षलवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा रक्षकांनी जंगल परिसरात घेराव घातला. यावेळी नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याला सुरक्षा रक्षकांनी प्रत्युत्तर देत पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. तसेच, यावेळी नक्षलवाद्यांनी आपल्या कमांडरना वाचविण्यासाठी सगल सहा आयईडी स्फोट केले.
दुसरीकडे, आज छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. दंतेवाडात जिल्हा राखीव सैनिक (डीआरजी) व विशेष कृती दलाच्या जवानांनी गोंदरस जंगलात ही संयुक्त कारवाई केली आहे. अरनपूरजवळ असलेल्या गोंदरसच्या जंगलात ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत पहिल्यांदाच महिला कमांडो सहभागी झाल्या होत्या. घटनास्थळावरून एक रायफल, 12 बंदुकांसह मोठ्या प्रमाणात दारू गोळा आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईनंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.
याशिवाय, छत्तीसगडमधील बिजापूर येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी (21 एप्रिल) चकमक झाली होती. छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी विशेष पथक (ग्रेहाऊंड फोर्स) आणि छत्तीसगड पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. बिजापूर येथे सकाळी सर्च ऑपरेशन सुरू असताना जंगलात लपून बसलेल्या काही नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून या पोलिसांनीही गोळीबार केला होता. चकमकीदरम्यान दोन जणांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले होते.