नवी दिल्ली - पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पदुचेरी येथे नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. यात तामिळनाडू वगळता इतर राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला. या निवडणुकांतील पराभवाची समीक्षा करण्यासाठी काँग्रेसने 5 सदस्यांची एक समिती तयार केली होती. या समितीने आता आपला अहवाल काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (sonia gandhi) यांना सोपवला आहे. (Five member committee of Congress submitted its initial report to sonia gandhi on defeat in assembly elections 2021)
समितिला देण्यात आला होता दोन आठवड्यांचा कालावधी -मिळालेल्या माहितीनुसार, या समितीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद, मनीष तिवारी आणि विंसेट पाला यांचा समावेश होता. तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे या समितीचे नेतृत्व होते. या समितीने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पदुचेरीतील नेत्यांशी अनेक बैठका केल्या. अहवाल सादर करण्यासाठी या समितीला दोन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता.
प्रियांका गांधींना अध्यक्ष करा; मागणी जोर धरू लागली
सोनिया गांधींनी दिला होता समितीचा प्रस्ताव -या समितीतील माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी हे काँग्रेसच्या ‘जी 23’ समूहाचेही सदस्य आहेत. या समूहाने संघटनात्मक निवडणूक आणि जबाबदारीसह उत्तरदायित्व निश्चित करण्याची मागणी गेल्या काही महिण्यांपासून करत आहे. काँग्रेस कार्य समितीच्या (सीडब्ल्यूसी) डिजिटल बैठकीत, निवडणूक निकालाच्या कारणांची माहिती मिळविण्यासाठी एक छोटी समिती तयार करण्यात यावी, असा प्रस्ताव सोनिया गांधी यांनी ठेवला होता, याला सीडब्ल्यूसीने सहमती दर्शवली होती.
पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे खातेही उघडले नाही -आसाम आणि केरळमध्ये पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. तर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे खातेही उघडले नाही. तसेच पदुचेरीतरही काँग्रेसचा पराभव झाला. येथे निवडणुकीच्या काही दिवस आधीपर्यंत काँग्रेस सत्तेत होती. तामिळनाडू काँग्रेसला थोडा बहूत दिलासा मिळाला, येथे द्रमूकसोबत असलेल्या त्यांच्या आघाडीला विजय मिळाला.