Lakhimpur Kheri Violence : राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय शिष्टमंडळ उद्या लखीमपूर खीरीला पोहोचणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 10:04 PM2021-10-05T22:04:26+5:302021-10-05T22:26:25+5:30
rahul gandhi : लखीमपूर खीरीमध्ये रविवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला होता. यामध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी म्हणजेच उद्या लखीमपूर खीरी येथे जाणार आहेत. राहुल गांधी हे या दौऱ्यावेळी पाच सदस्यीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील. लखीमपूर खीरीमध्ये रविवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला होता. यामध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. दरम्यान, या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला. (rahul gandhi to visit lakhimpur kheri in uttar pradesh, tomorrow)
यापूर्वी उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधींसह 10 जणांविरोधात शांतता भंग केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ज्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांच्यामध्ये काँग्रेसचे नेते दीपेंद्र हुड्डा आणि अजय कुमार लल्लू यांची नावे आहेत.
लखीमपूर खीरीला जाताना प्रियंका गांधी यांना सीतापूरच्या हरगाव येथे पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. यानंतरच त्यांना अटक करण्यात आली. सध्या प्रियांका गांधी यांना ज्या पीएसी गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले होते, त्याला तात्पुरते कारागृह म्हणून घोषित करण्यात आले आहे.
प्रियंका गांधी यांनी मंगळवारी सकाळी आपल्याला एका दिवसापेक्षा जास्त काळ ताब्यात घेतल्यामुळे प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी ट्विट करून म्हटले होते की, "नरेंद्र मोदी सर, तुमच्या सरकारने मला कोणत्याही आदेश आणि एफआयआरशिवाय गेल्या 28 तासांपासून ताब्यात घेतले आहे. पण ज्याने शेतकऱ्यांना चिरडले त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही."
.@narendramodi जी आपकी सरकार ने बग़ैर किसी ऑर्डर और FIR के मुझे पिछले 28 घंटे से हिरासत में रखा है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 5, 2021
अन्नदाता को कुचल देने वाला ये व्यक्ति अब तक गिरफ़्तार नहीं हुआ। क्यों? pic.twitter.com/0IF3iv0Ypi
दरम्यान, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे रविवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळानंतर आता परिस्थिती शांत झाल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. मात्र, सुरक्षा व्यवस्था चोख आणि कडक ठेवण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या आणीबाणीसाठी प्रशासन सज्ज आहे.
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. केंद्रातील मोदी सरकार आणि उत्तर प्रदेशमधील योगी सरकारविरोधात संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळत आहे. लखीमपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात (Lakhimpur Kheri Violence) आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे काही शेतकरी नेत्यांनी आशिष मिश्राच्या अटकेची मागणी केली होती. आंदोलनात मिश्रा यांच्या मालकीच्या एका कारसह तीन एसयूव्हीच्या ताफ्याने शेतकऱ्यांना धडक दिली आणि हा संघर्ष झाला. या तीन गाड्यांपैकी एक गाडी आशिष मिश्रा चालवत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.