चेन्नई - तामिळनाडूमध्ये हल्लीच झालेल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या एका उमेदवाराला केवळ एकच मत मिळाले. भाजपाचे पदाधिकारी डी. कार्तिक यांना केवळ एकच मत मिळाले. उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्या घरात एकूण पाच सदस्य आहेत. डी. कार्तिक यांना एक मत मिळण्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे अखेर कार्तिक यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. (BJP Candidate Got Only One Vote In Election in Tamilnadu)
कोईंबतूर जिल्ह्यातील पेरियानाइकनपालयम येथील वॉर्ड सदस्यपदासाठी निवडणूक लढणारे डी. कार्तिक यांना केवळ एक मत मिळाल्याच्या बातमीबाबत लेखिका आणि कार्यकर्त्या मीना कंदासामी यांनी ट्विट केले. त्यात त्या म्हणाल्या की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला केवळ एक मत मिळाले. मला त्यांच्या घरातील चार इतर सदस्यांचा अभिमान आहे. ज्यांनी इतरांना मत देण्याचा निर्णय घेतला.
तर काँग्रेस नेते अशोक कुमार यांनी सांगितले की, वॉर्ड सदस्यपदासाठी निवडणूक लढमाऱ्या भाजपा उमेदवाराच्या घरात पाच सदस्य आहेत. मात्र या भाजपा उमेदवाराला कोईंबतूनमधून केवळ एक मत मिळाले. एका अन्य ट्विटर युझरने सांगितले की, कार्तिक यांनी आपल्या निवडणूक प्रचारासाठी प्रसिद्ध केलेल्या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा आणि स्वत:सह सात सदस्यांचे फोटो होते. मात्र त्यांना केवळ एक मत मिळाले
दरम्यान, द न्यू इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधत भाजपा यूथ विंगचे जिल्हा उपाध्यक्ष कार्तिक यांनी सांगितले की, मी भाजपाकडून निवडणूक लढवली नव्हती. मी कार या निशाणीवर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. माझ्या कुटुंबात चार मते आहेत आणि ही सर्व मते वॉर्ड क्रमांक चारमध्ये आहेत. मी वॉर्ड क्रमांक ९ मधून निवडणूक लढवली. तिथे माझ्या कुटुंबातील सदस्यांसह माझेही मत नाही आहे. दरम्यान, सोशल मीडियावर ट्रोलर्सकडून माझा चुकीचा उल्लेख केला जात आहे. मी भाजपाकडून निवडणूक लढवली होती. आणि मला माझ्या कुटुंबातील सदस्यांनीही मतदान केलं नाही, असा दावा केला जात आहे, तो चुकीचा आहे.
तामिळनाडूमध्यील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ६ आणि ९ ऑक्टोबर रोजी दोन टप्प्यात झाली होती. या निवडणुकीत एकूण २७ हजार ००३ पदांसाठी ७९ हजार ४३३ उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीच्या प्राचारादरम्यान कार्तिक यांनी आपल्या पोस्टरसह पीएम नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहसारख्या मोठ्या चेहऱ्यांचा वापर केला होता. मात्र तरीही त्यांना केवळ एक मत मिळाले.