श्रीनगर: काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराने हाती घेतलेल्या 'मिशन ऑल आउट'ला आज मोठं यश मिळालंय. शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर सद्दाम पाडर याच्यासह पाच जणांना जवानांनी कंठस्नान घातलं आहे. सद्दाम मारला गेल्यानं बुरहान वानी गँग 'खल्लास' झाली आहे. दहशतवाद्यांना जाऊन मिळालेल्या काश्मीर विद्यापीठातील प्राध्यापकालाही जवानांनी ठार केल्याचं कळतं.
शोपियान जिल्ह्यातील बडीगाम क्षेत्रात आज सकाळपासून दहशतवादी आणि जवानांमध्ये धुमश्चक्री सुरू होती. दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू होता. दहशतवाद्यांची गोळी लागून दोन जण जखमीही झाले होते. त्यानंतर, जवानांनी केलेल्या व्यूहरचनेत दहशतवादी अडकले आणि दुपार व्हायच्या आतच त्यांचा 'खेळ खल्लास' झाला. बुरहान गँगमधील एकमेव जिवंत हिज्बुल कमांडर सद्दाम पाडर याच्यासोबत मोहम्मद रफी भट्ट, बिलाल मौलवी, आदिल मलिक हे चकमकीत ठार झालेत. पाच दहशतवाद्यांचे मृतदेह लष्कराने ताब्यात घेतले आहेत.
या कारवाईदरम्यान, ४४ राजपुताना रायफल्सचा एक जवान आणि पोलीस अनिल कुमार जखमी झाले. त्यांना तातडीने लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
वर्षभरात ५९ दहशतवादी ठार
भारताच्या नंदनवनात शांतता नांदावी, या हेतूने काश्मीर खोऱ्यातून दहशतवादाचा बिमोड करण्याचा विडाच लष्कराने उचलला आहे. २०१७ मध्ये, देशात घुसखोरी करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २०८ दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातलं होतं. या वर्षी आत्तापर्यंत ५९ दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं समजतं.
गेल्या महिन्यात पुलवामा इथं जवान आणि पोलीस यांनी संयुक्तपणे दोन दहशतवाद्यांना ठार केलं होतं. त्यात हिज्बुल मुजाहिदीनचा टॉप कमांडर समीर टायगरही होता. बुरहान वानीनंतर तो हिज्बुलचा 'पोस्टर बॉय' झाला होता. पण, जवानांनी अत्यंत चलाखीने त्याचा खेळ संपवला आणि आता सद्दामलाही ठार केलं.