गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. दोन महिलांचे विवस्त्र व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यात पुन्हा तणाव वाढला आहे. या घटनेवर संपूर्ण देशात संताप व्यक्त होत असून कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, मणिपूरच्या १० आमदारांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे. आणखी ५ महिलांसोबत अशा घटना घडल्याचा दावा या आमदारांनी निवेदनाद्वारे केला आहे. यातील तीन महिला अशा आहेत, ज्यांच्यावर बलात्कार झाल्याचा दावाही करण्यात आला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात या घटना घडल्या आहेत.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूरमध्ये हिंसेचा आगडोंब, मुख्य आरोपीचं घर जाळलं
निवेदन देणार्या आमदारांपैकी एक असलेल्या लालियांग मंग खौटे यांनीही अशा घटना घडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आणखी एक आमदार लेटपाओ हाओकीप यांनी अशा घटनांबद्दल बोलले आहे. ते म्हणाले की, आमच्याकडे अशा घटनांचे व्हिडीओ नाहीत. मात्र गेल्या दोन महिन्यांत राज्यात अशा घटना घडल्या आहेत. याबाबत आम्ही पीडितांच्या कुटुंबीयांशी बोललो आहोत आणि त्या आधारे निवेदन जारी केले आहे. मात्र, त्यांच्या दाव्याच्या समर्थनार्थ आमदारांनी कोणतीही तपशीलवार माहिती दिलेली नाही. पोलिसांकडूनही अशा प्रकरणांना दुजोरा मिळालेला नाही.
आमदारांच्या या दाव्यांवर कोणत्याही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने भाष्य केलेले नाही. या प्रकरणांचा तपास सीबीआयमार्फत करावा, अशी मागणी आमदारांनी सरकारकडे केली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यात पुन्हा संताप उसळला आहे. या घटनेतील मुख्य आरोपीच्या घराला शुक्रवारी आग लावली. सरकारने राज्यात इंटरनेटवर बंदी घातली आहे, केंद्र सरकारने कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचा व्हिडीओ शेअर करण्यावर बंदी घातली आहे.