ऑनलाइन लोकमत
कोल्लम, दि. १२ - पुत्तिंगल देवी मंदिरातील अग्नि दुर्घटनेनंतर फरार असलेले मंदिर व्यवस्थापन समितीचे पाच सदस्य मंगळवारी सकाळी केरळ पोलिसांना शरण आले. रविवारी पहाटे मंदिर परिसरात फटाक्यांच्या आतशबाजी दरम्यान भीषण आग लागून १०० पेक्षा अधिक नागरीकांचा मृत्यू झाला होता.
मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयालाल, सचिव जे.क्रृष्णाकुट्टी, शिवा प्रसाद, सुरेंद्रन पिल्लई आणि रविंद्रन पिल्लई यांनी आपल्याला शरण यायचे असल्याचे पोलिसांना सांगितले. परावूर येथे पोलिसांनी त्यांना अटक केली. मंदिर परिसरातील अग्नितांडवानंतर हे पाचही आरोपी फरार झाले होते.
केरळमधील ही एक मोठी अग्नि दुर्घटना आहे. ज्यामध्ये १०० हून अधिक नागरीकांचा बळी गेला, ३५० पेक्षा जास्त नागरीक जखमी झाले. केरळ पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरु केल्यानंतर सहाजणां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कलम ३०७ ( हत्येचा प्रयत्न), कलम ३०८ या कलमातंर्गत आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.