नवी दिल्लीकोरोनाच्या नव्या स्ट्रेनने लंडनमध्ये धुमाकूळ घातलेला असताना सोमवारी रात्री लंडनहून दिल्लीला आलेल्या प्रवासी विमानातील ५ प्रवासी हे कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.
एकूण २६६ प्रवासी या विमानामध्ये होते. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील ५ प्रवाशांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आता भारताची चिंता वाढली आहे. कारण, युरोपमध्ये सध्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने हाहा:कार माजवला आहे. त्यामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा चतुर्थ श्रेणीचा कडक लॉकडाउन जाहीर केला आहे.
भारतानेही ब्रिटनमधील भयावह परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर लंडनमधून येणाऱ्या सर्व प्रवासी विमानांवर ३१ डिसेंबरपर्यंत बंदी घातली आहे. पण सोमवारी रात्री लंडनहून शेवटची ५ विमानं भारतात आली आहेत. यातील दिल्ली विमानतळावर उतरलेल्या विमानातील प्रवाशांपैकी ५ प्रवासी आता कोरोना संक्रमिक आढळले आहेत.