नडियाद - गुजरातच्या खेडा जिल्ह्यामध्ये मिथाईल अल्कोहोलचा अंश असलेले आयुर्वेदिक कफ सिरफ घेतल्यानंतर गेल्या दोन दिवसात पाच जणांचा मृत्यू झाला, असा पोलिसांना संशय आहे. त्या कफ सिरपची विक्री करणाऱ्या दुकानदारासह तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
नडियाद येथील बिलोदरा या गावातील एका औषधाच्या दुकानातून कालमेघासव-आसवअरिष्ट या नावाचे आयुर्वेदिक कफ सिरप किमान ५० जणांना विकण्यात आले आहे. हे सिरप घेतलेल्या गावकऱ्यांच्या रक्ताचा नमुना तपासण्यात आला. या कफ सिरपमध्ये मिथाईल अल्कोहोल असल्याचे या नमुन्याच्या तपासणीत आढळून आले. ही माहिती खेडाचे पोलिस अधीक्षक राजेश गाढिया यांनी दिली. हे कफ सिरप घेतलेल्यांपैकी पाच जणांचा गेल्या दोन दिवसात मृत्यू झाला आहे. तसेच आणखी दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिथाईल अल्कोहोल हे विषारी द्रव्य असून, ते मिसळलेले कफ सिरप प्यायल्याने पाच जणांचा मृत्यू झाला, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
काही लोक नशा येण्यासाठीही कफ सिरपचा वापर करतात. त्यामुळे गुजरातमधील घटनेचा तपास करताना पोलीस त्याही शक्यतेचा शोध घेणार आहेत. गुजरातमधील बिलोदरा, बागडू या दोन गावांत मिळून दोन दिवसांत पाच जणांचा कफ सिरप प्यायल्यामुळे मृत्यू झाला असे सांगण्यात आले. (वृत्तसंस्था)