शिवपुरी (म.प्र.) : मध्य प्रदेशच्या शिवपुरीपासून ५५ किमी अंतरावरील सुभाषपुरा पोलीस ठाण्यांतर्गत नैसर्गिक धबधब्याच्या प्रवाहात अचानक वाढ होऊन चार ते पाच लोक वाहून गेले. दरम्यान, धबधब्याजवळील मोठमोठ्या शिळांमध्ये किमान २७ जण अडकून पडले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते. केंद्रीय मंत्री नरेंद्र तोमर यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याचा आढावा घेतला.स्वातंत्र्यदिनाची सुटी असल्यामुळे लोकांनी या पर्यटनस्थळी गर्दी केली होती. हा भाग पहाडी असून पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे अडकून पडलेल्या ३५ जणांपैकी ८ जणांना हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आल्याची माहिती शिवपुरीच्या जिल्हाधिकारी शिल्पा गुप्ता यांनी दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश हिंगणकर यांनी चार ते पाच लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली. (वृत्तसंस्था)
धबधब्याच्या पाण्यात पाच जण वाहून गेले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 4:15 AM