अंबाला: अंबाला: भारताच्या सामर्थ्यात मोलाची भर घालणारी, शत्रूंनी धडकी भरवणारी राफेल विमानं (Rafale Fighter Jets In India) हरयाणाच्या अंबालात दाखल झाली आहेत. तब्बल सात हजार किलोमीटरचं अंतर कापून राफेल विमानं भारतात आली आहेत. चीनच्या सीमेवरील वाढता तणाव पाहता भारतानं फ्रान्सकडे राफेल विमानं लवकर पाठवण्याची मागणी केली. भारताच्या मागणीला फ्रान्सनं सकारात्मक प्रतिसाद दिला. अखेर आज पाच राफेल विमानं भारतात दाखल झाली आहेत. हवाई दलाच्या अंबाला तळावर राफेल विमानांनी शानदार लँडिंग केलं आहे. गेल्या ३ महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये तणाव वाढला आहे. सीमावर्ती भागात चीनच्या कुरघोड्या सुरूच आहेत. ही परिस्थिती पाहता भारतानं राफेल विमानांचा ताबा लवकर देण्याची विनंती फ्रान्सला केली होती. त्यानंतर लगेचच फ्रान्सनं ५ राफेल विमानांची पाठवणी केली. दुपारी साडे तीनच्या सुमारास या विमानांनी अंबालामध्ये लँडिंग केलं आहे. त्या क्षणांचा व्हिडीओ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शेअर केला आहे. राफेलमुळे भारताचं लष्करी सामर्थ्य वाढणार आहे. कोणत्याही मोहिमेवर जाण्याची क्षमता राफेलमध्ये आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील सध्याच्या तणावपूर्ण स्थितीत राफेल विमानं निर्णायक आणि परिणामकारक कामगिरी बजावू शकतात.फ्रान्सनं पहिल्या टप्प्यात भारताला ५ राफेल विमानं दिली आहेत. या विमानांनी भारतीय हद्दीत प्रवेश करताच 2 SU30 MKIs विमानांनी त्यांच्या एस्कॉर्टसाठी उड्डाण केलं. ही सात विमानं आकाशात उड्डाण करतानाच सुंदर व्हिडीओ संरक्षणमंत्र्यांनी ट्विटरवर शेअर केला होता. राफेल विमानं भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होताच त्यांच्यावर मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत. अंबाला हवाई तळावर भारतीय हवाई दलाची ही नवीन राफेल लढाऊ विमानं तैनात केली जाणार आहेत. अंबाला हवाई तळाचं सामरिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. अंबालापासून चीन आणि पाकिस्तान अतिशय जवळ आहेत. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये अंबालातून आकाशात झेपावून राफेल विमानं शत्रूवर तुटून पडू शकतात.