संजय शर्मा
नवी दिल्ली : निवडणूक आयोग दोन ते तीन दिवसांत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर करू शकतो. २० नोव्हेंबर ते १० डिसेंबरदरम्यान या होऊ शकतात. मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये एकाच तारखेला, तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होऊ शकते.
२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी या निवडणुका सेमीफायनल मानल्या जात आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव गौबा यांनी शुक्रवारी राज्यांतील निवडणूक अधिकारी, निरीक्षकांची बैठक घेतली. दिवाळीनंतर १९ नोव्हेंबरपर्यंत म्हणजे छठपर्यंत सण सुरू राहतील. २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर दरम्यान निवडणुका होण्याची शक्यता आहे. मतमोजणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकते.
भाजप काँग्रेसमध्ये थेट लढत
राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार आहे, तर मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे.
महिला आरक्षणाची पहिली परीक्षा
संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक असेल ज्यामध्ये देशातील निम्मी लोकसंख्या असलेल्या महिलांची प्रतिक्रिया मिळणार आहे. जातनिहाय जनगणनेची मागणी राज्यांमधून होत आहे. यात त्याचा परिणामही दिसेल. काँग्रेसने मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर जातनिहाय जनगणना करण्याची घोषणाही केली आहे.