नवी दिल्ली : ज्या पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत, तिथून निवडणूक आयोगाच्या पथकांनी आतापर्यंत तब्बल ६२ कोटी रुपये ताब्यात घेतले आहेत. ही सर्व रक्कम बेहिशेबी असून, मतदारांना वाटण्यासाठी ती वापरण्यात येणार होती, असा अंदाज आहे.एकट्या तामिळनाडूमधून निवडणूक आयोगाच्या पथकांनी २४ कोटी ९0 लाख रुपये ताब्यात घेतले आहेत. तामिळनाडूमध्ये पुढील महिन्यात मतदान होणार असून, आता कुठे तिथे प्रचाराला सुरुवात होत आहे. आसाममध्ये दोन टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले आहे, तर पश्चिम बंगालमध्येही मतदानाचे दोन टप्पे पूर्ण झाले असून,अद्याप चार टप्प्यांचे मतदान व्हायचे आहे. आसाममधून १२ कोटी ३३ लाख रुपये, तर पश्चिम बंगालमधून १२ कोटी ८४ लाख रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत. केरळमध्येही अद्याप मतदान व्हायचे असून, आतापर्यंत त्या राज्यातून ११ कोटी ७३ लाख रुपये जप्त करण्यात आले. पुडुच्चेरीमध्येही मतदान व्हायचे असून, तेथून ६0 लाख ८८ हजार रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत. हे आकडे रविवारपर्यंतचे असून, पश्चिम बंगालमधून आणखीही काही बेहिशेबी रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. त्याची अद्याप मोजदाद व्हायची आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पाच राज्यांतून ६२ कोटी ताब्यात
By admin | Published: April 19, 2016 3:19 AM