पाच राज्यांचे निकाल देतील लोकसभा निवडणुकांचा कल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 04:40 AM2018-12-08T04:40:49+5:302018-12-08T04:41:05+5:30

पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे लोकसभेची सेमिफायनल म्हणून पाहिले जात असून, ११ डिसेंबर रोजी त्यांचे निकाल काय लागतात, त्यावर भाजपा व काँग्रेसचे भवितव्य अवलंबून असेल.

five states election results will be given to indication loksabha election | पाच राज्यांचे निकाल देतील लोकसभा निवडणुकांचा कल

पाच राज्यांचे निकाल देतील लोकसभा निवडणुकांचा कल

Next

नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरम या पाचही राज्यांतील विधानसभा निवडणुकांकडे लोकसभेची सेमिफायनल म्हणून पाहिले जात असून, ११ डिसेंबर रोजी त्यांचे निकाल काय लागतात, त्यावर भाजपा व काँग्रेसचे भवितव्य अवलंबून असेल. जनता अद्यापही भाजपाच्या बाजूने आहे की पुन्हा काँग्रेसच्या बाजूने वळू लागली आहे, हे या निकालांतून स्पष्ट होणार आहे.
पाचही राज्यांचे मतदान पूर्ण झाले आहे. यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या राज्यांत गेल्या निवडणुकांत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. छत्तीसगड व मध्य प्रदेश १५ वर्षे भाजपाकडे आहेत. हा भाग उत्तर भारतातील आहे. त्यामुळे हे निकाल उत्तर भारतातील मतदारांचाच कल सांगणारे असू शकतात. गेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपाला सर्वाधिक जागा उत्तर भारतातच मिळाल्या होत्या आणि त्याआधारेच केंद्रात सत्ता स्थापन करणे शक्य झाले होते. नेमक्या या राज्यांत भाजपाला आता फटका बसला तर त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकांवर होईल.
या पाचपैकी किमान दोन राज्ये तरी आपल्याला मिळावीत, असा काँग्रेसचा प्रयत्न होता. मध्य प्रदेश व राजस्थान ही दोन राज्ये भाजपाच्या हातातून निसटून काँग्रेसकडे आली, तर त्या पक्षाचे नेते हर्ष-उल्हासाने नाचूच लागतील. तरीही काँग्रेसची नजर मात्र राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडवर आहे. तिथे भाजपाला हादरा बसणे काँग्रेसला महत्त्वाचे वाटते. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्व पक्षात सर्वमान्य असले तरी त्यांनी विजय मिळवून दिला, हे काँग्रेसजनांना पाहण्याची इच्छा असणार. स्वत: राहुल गांधी यांचीही यापेक्षा वेगळी इच्छा असू शकत नाही. त्यामुळेच भाजपा व काँग्रेस यांच्यासाठी ही सेमिफायनल अतिशय अत्यंत महत्त्वाची आहे.

कोणत्या राज्यात काय स्थिती?
>राजस्थान : काँग्रेसला मिळू शकते, असे मतदानपूर्व चाचण्यांतून दिसून आले आहे. पण त्याला बराच कालावधी लोटला आणि त्या काळात प्रचाराचा जोर होता. मतदारांवर प्रचाराचा प्रभाव पडतो की ते आधीच निर्णय घेतात, हे राजस्थानच्या निकालांतून स्पष्ट होईल.
>मध्यप्रदेश : सुरुवातीच्या काळात भाजपाविरोधात वातावरण दिसत होते. तरीही भाजपाला सत्ता मिळेल, असेच सर्व सर्व्हे सांगत होते. सट्टाबाजारही तेच म्हणत होता. पण निकालांनंतर मध्यप्रदेश भाजपाच्या हातून जाईल, असे सट्टेबाजांनी म्हटले आहे. सट्ट्यांवर करोडो रुपये लागतात. त्यामुळे सट्टेबाज खरे ठरतात की सर्व्हेचे निष्कर्षच प्रत्यक्षात येतात, हे ११ डिसेंबरला कळेल.
>छत्तीसगड : आपल्याला विजय मिळेल, असे तेथील काँग्रेस नेते सांगत आहेत. त्यांनी निकालांनंतर लगेचच आपल्या विजयी उमेदवारांना रिसॉर्टमध्ये ठेवण्याचे ठरविले आहे. आमदारांची फोडाफोेडी भाजपाने करू नये, यासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचे काँग्रेसच्या नेत्याने सांगितले. पण मतदानपूर्व चाचण्यांनी मात्र छत्तीसगड पुन्हा भाजपाच्या ताब्यात राहील, असे म्हटले आहे. अजित जोगी व मायावती यांच्या आघाडीमुळे काँग्रेसची मते फुटतील आणि त्याचा भाजपाला फायदा होईल, असे त्यातून दिसून आले होते.
>तेलंगणा : काय होणार, हा प्रश्न आहे. तिथे तेलंगणा राष्ट्र समितीचीच पुन्हा सत्ता येईल, असे जवळपास सर्वच मतदानपूर्व चाचण्यांनी म्हटले होते. तिथे काँग्रेसप्रणीत आघाडी व टीआरएस यांच्यात खरी लढत आहे. काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी खासदार लगडपती राव यांचे आतापर्यंतचे निवडणूक अंदाज खरे ठरले आहेत. यावेळी त्यांनी म्हटले आहे की ६८ टक्क्यांहून अधिक मतदान झाले, तर तेलंगणामध्ये टीआरएसचा पराभव होऊ शकतो. मतदान त्याहून कमी झाले, तर राज्यात विधानसभा त्रिशंकू असेल. प्रत्यक्षात जे मतदान झाले आहे, ते पाहता, त्यांच्या अंदाजानुसार तिथे टीआरएसच्या हातातून सत्ता जायला हवी. तसे होते का, हे पाहणे महत्त्वाचे असले तरी टीआरएसच्या मदतीला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे एमआयएम व भाजपा उभ्या राहिल्यास चित्र बदलू शकते, हेही विसरून चालणार नाही.
>मिझोरम : काँग्रेसची सध्या सत्ता आहे आणि मुकाबला आहे मिझो नॅशनल फ्रंटशी. तिथे भाजपाची फारशी ताकद नाही. पण पुन्हा काँग्रेसला सरकार बनवता येऊ नये, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असे भाजपाचे नेते हिमांत बिस्वा सर्मा यांनी म्हटले आहे. म्हणजेच प्रसंगी तिथे काँग्रेसच्या आमदारांना फोडण्याचे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: five states election results will be given to indication loksabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.