सुरेश भटेवरा, नवी दिल्लीदेशाचे राजकीय चित्र बदलण्याची क्षमता असलेल्या उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसह पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर अशा आणखी ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे मतदान येत्या फेब्रुवारी /मार्च महिन्यात एकाचवेळी होण्याची शक्यता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी वर्तवली आहे.
उत्तरप्रदेश विधानसभेचा कार्यकाल २७ मे २0१७ रोजी, गोवा, मणिपूर आणि पंजाब विधानसभांचा कार्यकाल १८ मार्च रोजी तर उत्तराखंडाचा २७ मार्च रोजी संपतो आहे. या राज्यांमधे त्यापूर्वीच नव्या विधानसभांची निवडणूक पार पडावी, असा आयोगाचा दृष्टिकोन आहे. उत्तरप्रदेशात ७ टप्प्यात तर अन्य राज्यात प्रत्येकी एकाच दिवशी मतदान पार पाडण्याची तयारी आयोगाने सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीत अडीच वर्षांपूर्वी भाजपने उत्तरप्रदेशच्या ८0 पैकी ७0 जागा जिंकून विक्रम प्रस्थापित केला होता. तब्बल १५ वर्षानंतर या राज्याच्या सत्तेची सूत्रे पुन्हा आपल्या हाती यावीत, यासाठी सध्या भाजपने सारी शक्ती पणाला लावली आहे. सत्ताधारी समाजवादी पक्षाला सध्या विचित्र गृहकलहाने ग्रासले आहे. मुस्लिम मतदार त्यामुळे मोठया प्रमाणात बसपकडे वळण्याची चिन्हे दिसत असून त्याचा लाभ मायावतींना मिळेल अशी शक्यता आहे. भाजपची लढत मात्र बसप आणि समाजवादी अशा दोन्ही पक्षांशी आहे.
पंजाबमधे सलग १0 वर्षे सत्तेत असलेल्या शिरोमणी अकाली दल व भाजपच्या आघाडीसमोर काँग्रेस व आप अशा दोन पक्षांनी सध्या कडवे आव्हान उभे केले आहे. सत्तेसाठी अंतिम लढाई मात्र इथे काँग्रेस व आपमधे होण्याची शक्यता वर्तवली जाते. उत्तराखंडात कायदेशीर लढाईत काँग्रेसला यश मिळाले तरी सत्ता विरोधी भावना (अँटी इन्कम्बन्सी) चा सामना करतांना काँग्रेससमोर भाजपचे प्रबळ आव्हान उभे आहे. गोव्यात भाजपला आपली सत्ता राखण्यासाठी काँग्रेस व आप अशा दोन पक्षांशी झुंज द्यावी लागणार आहे तर मणिपुरात सत्ता कायम राखण्यासाठी काँग्रेसला बरेच कष्ट घ्यावे लागणार आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर करता यावा, यासाठी केंद्र सरकारने निवडणूक आयोगाकडे परवानगी मागीतली आहे. या कारणामुळे आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका आपल्यावर येऊ नये, यासाठी आयोगाला केंद्र सरकारने विनवणी केली. तथापि बजेट साऱ्या देशासाठी असल्यामुळे त्या प्रक्रियेला आयोगाची हरकत नाही मात्र बजेटमधे मतदानापूर्वी लोकांना आकर्षित करणाऱ्या घोषणांचे प्रमाण अधिक नसावे, असे आयोगाने बजावले आहे.
पाचही राज्यात स्वतंत्र व नि:पक्षपाती निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी, तसेच प्रचार मोहिमेत हिंसाचार,मतदान केंद्रे ताब्यात घेण्यासारखे प्रकार घडू नयेत, यासाठी राज्यातल्या पोलीस दलाखेरीज केंद्रीय राखीव दलाच्या १ लाख पोलीसांच्या तैनातीची आयोगाने मागणी केली आहे. या निवडणुकांचा विद्यार्थ्यांच्या १0 वी १२ वी च्या वार्षिक परीक्षांनाही अडथळा येऊ नये, याची दक्षताही आयोगाला घ्यावी लागणार आहे. त्यासाठीच उत्तरप्रदेशच्या ७ टप्प्यांसह अन्य चार राज्यांचे मतदान एकाचवेळी पार पाडण्याचा प्रयत्न आयोगाने चालवला आहे.प्रियंका गांधींमुळे वाढेल राहुल यांची शक्ती उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या जोरदार प्रचारात प्रियंका गांधी या ती शक्ती अनेकपटींनी वाढविणाऱ्या असतील, असे मत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांनी येथे व्यक्त केले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या लष्करी कारवाईचा राजकीय लाभासाठी भाजपकडून होणारा वापर लोक धुडकावून लावतील, असे दीक्षित म्हणाल्या. उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून दीक्षित यांनी नुकताच राज्याचा व्यापक दौरा केला. राहुल यांनी किसान यात्रेच्या माध्यमातून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केल्याचेही त्यांनी सांगितले. पक्षाची सूत्रे हाती द्या... राहुल यांनी राज्य पातळीवर पक्ष बळकट करण्यास मोठे कष्ट केले. आता ही वेळ त्यांनी पक्षाची सूत्रे हाती घेण्याची आहे, असे पुडुचेरीचे मुख्ममंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी येथे म्हटले.