राजधानी दिल्लीमधील बुराडी परिसरात बांधकाम सुरू असलेली एक इमारक कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. बुराडी परिसरात असलेल्या कौशिक एन्क्लेव्ह ऑस्कर स्कूलजवळ बांधकाम सुरू असलेली ही पाच मजली इमारत अचानक कोसळली. त्यात एका सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले. तसेच आणखी आठ जण ढिगाऱ्याखाली दबलेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या दुर्घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मागच्या वर्षभरापासून या इमारतीचं बांधकाम सुरू होतं. या इमारतीच्या फिनिशिंगचं काम सुरू असल्याने इथे काम करणारे कामगार इमारतीजवळच एका खोलीत राहत होते. जेव्हा ही इमारत कोसळली, तेव्हा ढिगारा या कामगारांच्या खोल्यांवर कोसळला.
इमातर कोसळली तेव्हा सुमारे २० ते २२२ जण इथे राहत होते. हे सर्वजण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताचा आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मदतकार्य सुरू करून १२ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांपैकी ३ पुरुषांची प्रकृती गंभीर आहे. तसेच त्यांना उपचारांसाठी ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आलं आहे. तसेच आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकलेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांसह स्थानिक आमदार आणि खासदार आदि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळाचा दौरा केला. तसेच या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करतानाच या प्रकरणात कोण दोषी आहे आणि कुणाच्या बेफिकीरीमुळे ही दुर्घटना झाली आहे, याचा तपास करून जे दोषी असतील त्यांच्यावरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.