कोलकाता- भारतात अनेक नद्यांवर वेगवेगळ्या पद्धतीचे पूल आहेत. पण कोलकात्याच्या हावडा ब्रिजची शानच वेगळी. त्यामुळे या ब्रिजच्या नावाने १९५८ मध्ये हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आणि खूप गाजला. मेरा नाम चून चून चून हे त्यातलं गाणंही खूप लोकप्रिय झालं.दो बिघा जमीन, गांधी, तीन देवीया, युवा, राम तेरी गंगा मैली, बर्फी, कहानी, पिकू, गुंडे अशा अनेक हिंदी आणि असंख्य बंगाली चित्रपटांचं शूटिंग त्या ब्रिजवर झालं. अगदी गेल्या आॅक्टोबरमध्ये हावडा ब्रिज नावाचा आणखी एक तेलगू चित्रपटही आला. या हावडा ब्रिजला दोन दिवसांपूर्वी, ३ फेब्रुवारी रोजी पंच्याहत्तर वर्षं पूर्ण झाली. हा ब्रिज ३ फेब्रुवारी १९४३ रोजी बांधून पूर्ण झाला. कोलकाता आणि हावडा या शहरांना जोडणारा हा ब्रिज. हुगली नदीवर बांधण्यात आलेला. त्याआधी तिथे पाँटून ब्रिज नावाचा पूल होता. तो पाडून बांधला हावडा ब्रिज. त्याचं नाव मुळात न्यू हावडा ब्रिज होतं आणि १९६५ साली त्याचे रबींद्र सेतू असं नामकरण करण्यात आलं. रवींद्रनाथ टागोर यांचं नाव त्याला दिलं असलं तरी आजही तो हावडा ब्रिज म्हणूनच ओळखला जातो. या पुलावरून रोज किमान १ लाख वाहनं ये-जा करतात. मुख्य म्हणजे या ब्रिजच्या दोन्ही बाजूंना पादचारी पथही आहे. त्यावरून ये-जा करणा-यांची संख्या दिवसा साधारणपणे दीड लाख आहे. या ब्रिजची लांबी फार नाही. त्याहून अधिक लांबीचे असंख्य ब्रिज भारतात आहेत. पण कँटिलिव्हर पद्धतीने बांधलेला हा सर्वात जुना पूल. त्याच्या बांधकामासाठी ३५ हजार टन लोखंड लागलं होते, जे टाटा स्टीलने पुरवलं होतं. तेव्हा गेट वे टू कलकत्ता या नावानं हा ब्रिज ओळखला जाई.
एका पुलाची पंचाहत्तरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 4:13 AM