श्रीनगर : बारामुल्ला जिल्ह्यातून पाच संशयित दहशतवाद्यांना शनिवारी सुरक्षा रक्षकांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटनेशी कनेक्शन असल्याची माहिती समजल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि लष्काराच्या संयुक्त टीमने या पाच जणांना अटक केली आहे.
सुरक्षा यंत्रणेकडून अटक करण्यात आलेल्या पाच संशयित दहशतवाद्यांची चौकशी सुरू आहे. पाचपैकी तीन संशयित हे लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचे धमकी असणारे पोस्टर लावून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते.
सुत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षा दलांना बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर परिसरात पाच जण दहशतवादी कारवाई करण्यात सामील असल्याची माहिती मिळाली होती. गुप्तचर यंत्रणेच्या आधारे मिळालेल्या या माहितीनंतर भारतील लष्कराच्या जवानांनी सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरू केले. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणाहून या पाच जणांना अटक केली. तसेच, त्यांच्याकडून काही संशयित साहित्य जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या मंगळवारी चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. तर, दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत.