नवी दिल्ली : दिल्लीतील शकरपूर भागामध्ये सोमवारी पोलिसांनी पाच दहशतवाद्यांना अटक केली. त्यातील दोन जण पंजाबचे व तीन जण काश्मीरचे आहेत. या दहशतवाद्यांचे पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय व खलिस्तानवाद्यांशी संबंध असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे. शौर्यचक्र पुरस्कार विजेते बलविंदरसिंग भिखीविंड यांच्या हत्येमागे हे दहशतवादी असल्याचा पोलिसांना संशय आहे.यासंदर्भात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे उपायुक्त प्रमोद कुशवाह यांनी सांगितले की, अटक केलेल्या पाच दहशतवाद्यांपैकी दोघे जण पंजाबमधील असून गुरजीतसिंग भुरा, सुखदीप अशी त्यांची नावे आहेत. उर्वरित तीन काश्मिरी आयएसआयच्या संपर्कात असल्याचेही आढळून आले. खलिस्तानवाद्यांविरोधात जोरदार लढा देणारे बलविंदरसिंग भिखीविंड यांची १६ ऑक्टोबर रोजी पंजाबमधील तरणतारण जिल्ह्यातील त्यांच्या गावी दोन जणांनी गोळी झाडून हत्या केली होती. खलिस्तानवाद्यांनीच हे कृत्य केले असावे असा पोलिसांचा कयास होता व त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
जातीय तणाव निर्माण करण्याचे कारस्थान दिल्ली पोलिसांनी सांगितले की, बलविंदरसिंग भिखीविंड हत्या प्रकरणाचा पंजाब पोलीस तपास करत आहेत. भिखीविंड यांच्या हत्येसाठी वापरलेली शस्त्रेही यांच्याकडून दिल्ली पोलिसांनी जप्त केली आहेत. पंजाबमध्ये हे दहशतवादी काही लोकांची ठरवून हत्या करत असत. जातीय तणाव निर्माण करण्याचे कारस्थान त्यामागे होते.