फतेहपूर : कानपूर-बरौनी येथील पेट्रोल, डिझेलची पाईपलाईन फोडून त्यामधून पाच हजार लीटर डिझेल चोरल्याच्या प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री याबाबतची माहिती मिळताच तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली आणि पाईपलाईनची तपासणी सुरु करण्यात आली.
रविवारी दुपारी फतेहपूरच्या हरदौलापूर गावातील शेतामध्ये खोदल्यानंतर पाईप लाईनच्या चोरीचा पॉईंट मिळाला. आता या छेदाला बंद करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कानपूर ते बरौनी असे इंधन पाईपलाईनद्वारे पाठविले जाते. शनिवारी मध्यरात्रीनंतर 56 मिनिटांसाठी पाईपलाईनमधील दाब कमी झाला. यामुळे तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना कुठेतरी पाईपलाईन फुटल्याचा संशय आला. यानंतर लगेचच डिझेलचा पुरवठा बंद करण्यात आला. अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजुने लिकेज शोधण्याचा प्रयत्न केला.
हरदौलापूर गावातील शेतामध्ये चोरीचा प्रकार समजल्यानंतर लगेचच पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. मात्र, पोलिसांनी शीघ्र प्रतिसाद न दिल्याने चोरट्यांना पकडणे कठीण बनल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाईपलाईनला व्हॉल्व लावण्यात आला होता. याद्वारे पाईप जोडून डिझेल काढण्यात येत होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, कमीतकमी दोनवेळा पाच हजार लीटर डिझेल काढण्यात आले. या काळात डिझेलच पाठविण्यात येत होते.
धक्कादायक बाब म्हणजे गेल्या वर्षी याच ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात इंधन अशाप्रकारेच चोरण्यात आले होते. तसेच दोन्ही वेळेला डिझेलच पाठविण्यात येत असल्याचे चोरांना कसे समजले, असा सवालही उपस्थित होत आहे. या टोळीमागे कोणीतरी तेल कंपनीतील अधिकारी तर नाही ना असा संशयही स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
तीन वर्षांपूर्वी टोळक्याला पकडले होतेनोव्हेंबर 2014 मध्ये पोलिसांनी गंचौली गावाजवळ सहा जणांच्या एका टोळक्याला डिझेलसह पकडले होते. त्यांच्याकडे डिझेल टँकर, पाईप आणि ड्रील मशीन सापडली होती.