‘नीट’: विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढण्यास सांगणाऱ्या पाच महिलांना अखेर अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 09:01 AM2022-07-20T09:01:42+5:302022-07-20T09:02:13+5:30

केंद्राने हस्तक्षेप करण्याची केरळच्या शिक्षणमंत्र्यांची मागणी; महिला आयोगाने घेतली दखल

five women who asked neet exam students to remove their underwear were finally arrested | ‘नीट’: विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढण्यास सांगणाऱ्या पाच महिलांना अखेर अटक

‘नीट’: विद्यार्थिनींना अंतर्वस्त्रे काढण्यास सांगणाऱ्या पाच महिलांना अखेर अटक

Next

कोल्लम/नवी दिल्ली : नीटच्या विद्यार्थिनींना अंतर्वस्त्र काढण्यास भाग पाडल्याविरुद्धच्या आंदोलनाला मंगळवारी केरळमध्ये हिंसक वळण लाभले. संतप्त विद्यार्थी कार्यकर्त्यांनी जेेथे हा कथित प्रकार घडला त्या शिक्षण संस्थेची तोडफोड केली. यामुळे कोल्लम जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. याप्रकरणी चाैकशीनंतर पाच महिलांना अटक करण्यात आली. या महिलांची आधी चौकशी करण्यात आली आणि नंतर त्यांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील तीन महिला एनटीएने नियुक्त केलेल्या एका एजन्सीसाठी काम करतात. तर, दोन महिला आयूर येथील खासगी शैक्षणिक संस्थेसाठी काम करतात. 

दुसरीकडे, विद्यार्थिनीने केलेला आरोप कपोलकल्पित असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) म्हटले आहे. दरम्यान, केरळ सरकारने हा मुद्दा केंद्राकडे उपस्थित करून एनटीएवर कडक कारवाईची मागणी केली आहे. त्याचबरोबर विद्यार्थिनींकडून प्राप्त तक्रारींच्या आधारे केरळ महिला आयोगानेही तक्रार दाखल केली आहे. 

एनटीएने नीट परीक्षार्थींच्या तपासणीसाठी केरळच्या कोल्लम जिल्ह्यात सुरक्षा एजन्सीची नेमणूक केली होती. या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी मुलींना त्यांची अंतर्वस्त्रे काढून ठेवण्यास सांगितले होते. एका १७ वर्षांच्या मुलीने याबाबत पोलिसांत तक्रार दिली. अन्य विद्यार्थिनींनीही असेच आरोप केले आहेत. 

आम्हाला कोणतीही तक्रार अथवा निवेदन मिळालेले नाही. वृत्तपत्रीय बातम्यांच्या आधारे परीक्षा केंद्राचे अधीक्षक व निरीक्षकांकडून आम्ही तत्काळ अहवाल मागवला. असा कोणताही प्रकार घडलेला नाही. तक्रार कपोलकल्पित असून, चुकीच्या हेतूने ती दाखल करण्यात आलेली आहे, असे अधीक्षक व निरीक्षकांनी आम्हाला कळविल्याचे एनटीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.  

अनेक कार्यकर्ते जखमी

- काल या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यापासूनच कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. मात्र, आज आंदोलन तीव्र झाले. विविध विद्यार्थी संघटनांनी निषेध मोर्चे काढले. ही घटना जेथे घडली त्या अयुर (जि. कोल्लम) येथील खासगी शिक्षण संस्थेला विद्यार्थी कार्यकर्त्यांनी लक्ष्य बनवले. 

- पोलिसांनी संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर केले सुरक्षा कडे भेदून कार्यकर्ते इमारतीत घुसले आणि त्यांनी प्रचंड तोडफोड केली. यावेळी पोलिसांशी झालेल्या झटापटीत अनेक कार्यकर्ते जखमीही झाले.  

विनयभंगाचा गुन्हा

तपासणी कर्मचाऱ्यांनी धातुचे हूक असल्याने अंतर्वस्त्र काढून ठेवण्यास सांगितले. मी नकार दिला. तेव्हा त्यांनी परीक्षेला बसता येणार नसल्याचे सुनावले. त्यामुळे मला अंतर्वस्त्र काढून ठेवावे लागले, असे विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. या तक्रारीवरून भादंविच्या कलम ३५४ (स्त्रीचा विनयभंग) आणि ५०९ (स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार, हावभाव व कृती करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे, असे पोलिसांनी सांगितले.  

कारवाईची मागणी 

केरळचे उच्च शिक्षणमंत्री आर. बिंदू यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांना पत्र पाठवून कारवाईची मागणी केली. विद्यार्थिनींच्या मान-मर्यादेवरील या हल्ल्याचे वृत्त ऐकून मला धक्का बसला, असेही बिंदू यांनी या पत्रात म्हटले आहे. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी आपण हस्तक्षेप करावा, अशी विनंतीही त्यांनी प्रधान यांना केली आहे.

महिला आयोगाकडे दोन तक्रारी

- आम्हाला दोन तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यावरून प्रथमद्दृष्ट्या ही कृती महिलांचा अवमान करणारी असल्याचे दिसते, असे केरळच्या महिला आयोगाने म्हटले आहे. आयोगाच्या अध्यक्षांनी एनटीएला पत्र पाठवून या घटनेला जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याची सूचना केली आहे. 

- परीक्षेसाठी कपडे काढायला लावणे यासारख्या असंस्कृत पद्धतीचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो आणि त्यांना परीक्षेवर लक्ष केंद्रित करता येत नाही, असे महिला आयोगाच्या अध्यक्ष पी. साथीदेवी यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: five women who asked neet exam students to remove their underwear were finally arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Keralaकेरळ