नवी दिल्ली - दिल्ली विद्यापीठातीलविद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने वर्चस्व मिळवलं आहे. येथील सन 2019 च्या निवडणुकीत एबीव्हीपीला 3 तर एनएसयुआय संघटनेला 1 पद मिळालं आहे. गुरुवारी झालेल्या मतदानप्रकियेत 39.9 टक्के मतदान झाले होते. यासाठी गुरुवारी सकाळी 8.30 पासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आली.
मतमोजणीला सकाळी सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा चारही जागांवर एबीव्हीपी पुढे होती. दिल्ली विद्यापीठा विद्यार्थी संघटनेसाठी गुरुवारी झालेल्या मतदाना प्रकियेत 39.9 टक्के विद्यार्थ्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. गतवर्षीच्या तुलनेत यंदाचे मतदान 4 टक्क्यांनी कमी असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षीही तीन पदांवर एबीव्हीपीने विजयाचा झेंडा रोवला होता. तर एनएसयुआय संघटनेला केवळ एकच पदावर समाधान मानावे लागले होते. एबीव्हीपी उमेदवारांच्या गळ्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संयुक्त सचिव पदाची माळ पडली आहे. तर, एनएसयुआय संघटनेने सचिव पदावर विजय मिळवला आहे.
अध्यक्षपदी अक्षित दहिया, उपाध्यक्ष पदावर प्रदीप तंवर आणि संयुक्त सचिव पदावर शिवांगी खरवाल यांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीत 4 महिलांसह एकूण 16 उमेदवार रिंगणात होते. तर 52 मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे 1.3 लाख विद्यार्थी मतदानसाठी पात्र होते. ईव्हीएम मशिनद्वारे ही मतदान प्रकिया पार पडली आहे.