काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दलितांच्या घरी हनिमून आणि पिकनिकसाठी जातात योगगुरू रामदेव बाबांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठी खळबळ माजली. लखनौमधील प्रचारसभेतील भाषणादरम्यान रामदेव बाबांनी अतिशय खालची पातळी गाठत हे विधान केले.
सुप्रिया सुळे यांना मतदान करा नाहीतर गावचे पाणी बंद करू अशी धमकी दिल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादीचे नेते व महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अडचणीत सापडले. एखाद्या गावाने माझ्या बहिणीच्या विरोधात जाऊन मतदान केले तर ती काही निवडणूक हरणार नाही. मात्र त्या गावाला पाणी मिळणार नाही हे लक्षात ठेवा अशी धमकीच त्यांनी गावक-यांना दिल्याचा आरोप झाला.
समाजातील तृतीयपंथी अर्थात ट्रान्सजेंडर यांना थर्ड जेंडर म्हणून कायदेशीर ओळख देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. तृतीयपंथीयांचा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांत समावेश करून घेण्याचा आदेशही सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला दिल्याने त्यांना शिक्षण नोकरी इत्यादी ठिकाणी आरक्षणही मिळेल.
बलात्कारप्रकरणातील महिलेलाही शिक्षा दिली पाहिजे असे वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केले. कोणतीही तरूणी मग ती विवाहीत असो वा अविवाहीत ती स्वखुषीने अथवा जबरदस्तीने एखाद्या तरूणासोबत जात असल्यास तिला फाशी दिली पाहिजे असे त्यांनी म्हटले. अबू आझमींच्या वक्तव्याचा त्यांच्या मुलाने व सुनेनेही विरोध केला.
ज्या व्यक्तीने जगासमोर आपल्या पत्नीचे नाव जाहीर करण्यास इतका काळ लावला ती व्यक्ती वा तो पक्ष इतर महिलांचा आदर कसा करेल? असे वक्तव्य करत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर हल्ला केला. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदींनी वाराणसी व बडोदा मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढववताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रथमच त्यांची पत्नी जसोदाबेन यांचा उल्लेख केला होता. त्याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हा टोला हाणला होता.
गुजरातमधील गोध्रा दंगलीचा ठपका असलेल्या तत्काली गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी माफी मागण्यास नकार दिला. आत्तापर्यंत बाळगलेले मौन सोडत मोदी म्हणाले की माझ्यावर केल्या गेलेल्या आरोपांमध्ये जराही तथ्य आढळल्यास मला भर चौकात फाशी द्या. याचा निर्णय आता जनतेच्या हातात आहे असेही ते एका मुलाखतीत म्हणाले.
एखाद्या मुलाने बलात्कार केला तर त्याला फाशीची शिक्षा देण्यात येऊ नये असे वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी उत्तर प्रदेशातील प्रचारसभेदरम्यान केल्याने मोठा गदारोळ माजला. मुलांकडून चुका होत असतात त्यांना या चुकांसाठी फाशी देणे योग्य नाही. केंद्रात आपले सरकार आले तर बलात्कारी मुलांना फाशी देणा-या कायद्यात आपण बदल करू. असेही त्यांनी म्हटले होते.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान "भाजपाला मत देऊन मुझफ्फरनगरचा बदला घेऊ शकता" हे वक्तव्य अमित शहा यांना चांगलेच भोवले. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तुमच्या सोबत न्याय झालेला नाही ही बदला घ्यायची वेळ आहे भाजपाला मतदान करून तुम्ही बदला घेऊ शकता असे वक्तव्य शहा यांनी राजहार गावातील निवडणूक प्रचारसभेदरम्यान केले होते.