२१ जून हा योगा डे म्हणून साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केल्यानंतर पहिलाच इंटरनॅशनल योगा डे अत्यंत उत्साहात देशभरात साजरा करण्यात आला.
मुंबईतल्या मालाडमध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे २१ जून रोजी तब्बल ९४ जणांनी प्राण गमावले.
भारतीय लष्कराने नागा दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा प्रतिशोध घेताना म्यानमारमध्ये घुसून ४ जूनच्या हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांच्या दोन तळांवर हल्ला केला आणि ते उध्वस्त केले.
मणीपूरमध्ये ४ जून रोजी नॅशनॅलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड (खापलांग गट)च्या दहशतवाद्यांनी मणीपूरमध्ये केलेल्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले तर ११ जण जखमी झाले.
आबालवृद्धांच्या लाडक्या मॅगीवर दिल्लीमध्ये ३ जून रोजी खाण्यास अपायकारकचा शिक्का मारत बंदी घालण्यात आली. अल्पावधीतच देशभर मॅगीवर बंदी घालण्यात आली. कधी कोर्टाचा दिलासा कधी राज्यांचा हिसका असा प्रकार वर्षाअखेरीपर्यंत सुरू राहिला. ताज्या चाचण्यांमध्ये मॅगी कसोटीस उतरली तर नवीन वर्षामध्ये फक्त दोन मिनिटातली मॅगी नूडल्स पुन्हा बाजारात दिसतील.
बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी दोषी आढळलेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने ११ मे च्या निकालात निर्दोष जाहीर केले आणि त्यांचा पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ९ मे रोजी प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना जीवन ज्योती बिमा योजना आणि अटल पेन्शन योजना घोषित केल्या आणि सर्वसामान्यांना विमा व पेन्शनचे कवच देण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले.
संसदेने ११९व्या घटनादुरुस्तीला ७ मे रोजी मंजुरी दिली. याअन्वये भारत व बांग्लादेशात सीमेवर असलेल्या एन्क्लेवच्या हस्तांतरणाचा मार्ग मोकळा झाला आणि अनेक दशके रखडलेला हा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसायला लागली.
जमिनीवरून हवेत मारा करणा-या आकाश या क्षेपणास्त्राची ५ मे रोजी यसस्वी चाचणी करण्यात आली आणि या क्षेपणास्त्राचा भारतीय लष्कराच्या ताफ्यात समावेश करण्यात आला.
२५ एप्रिल रोजी ७.९ रिश्टर स्केल इतक्या प्रचंड क्षमतेच्या भूकंपाने नेपाळ हादरला. उत्तर भारतातही या भूकंपाचे धक्के बसले. नेपाळमध्ये तर हाहाकार उडाला. तब्बल ९००० जणांचे प्राण या भूकंपाने घेतले तर २३ हजारांवर जखमी झाले आणि अक्षरश: लाखो लोक बेघर झाले. नेपाळनजीकच्या भारतीय राज्यांमध्ये १३० जणांनी प्राण गमावले.
दहशतवाद्यांच्या विळख्यात सापडलेल्या येमेनमधल्या भारतीयांच्या सुटकेसाठी परराष्ट्र खात्याने युद्धपातळीवर प्रयत्न केले. केवळ भारताच्याच नाही तर अन्य देशांच्या नागरिकांनाही भारताने मदतकेली. १० एप्रिल रोजी हे मिशन संपले तोपर्यंत ४६४० भारतीयांना व ४१ देशांमधल्या ९६० विदेशी नागरिकांची भारताने सुखरूप सुटका केली.
८ एप्रिल रोजी राष्ट्रपती भवनात ५० मान्यवरांचा पद्म पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये अमिताभ बच्चन दिलीप कुमार विजय भटकर अणूशास्त्रज्ञ एम. आर. श्रीनिवासन गणितज्ञ मंजूळ भार्गव स्वामी सत्यमित्रानंद आगा खान चौथे आदींचा समावेश होता.