नवी दिल्ली : विविध कारणांमुळे अनेकदा विमानाच्या उड्डाणाला उशीर होतो. परिणामी आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे काही प्रवासी सोशल मीडियातून आपला संताप व्यक्त करत असतात. मात्र विमान उड्डाणाला झालेल्या विलंबामुळे एका प्रवाशाने थेट पायलटवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंडिगो कंपनीच्या विमानात ही घटना घडली असून याबाबतचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
इंडिगोच्या एका विमानाच्या उड्डाणाला काही कारणास्तव प्रचंड उशीर झाला होता. त्यातच फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशनच्या नियमांनुसार आधीचा पायलट जाऊन नवीन पायलट विमानात आला. विमान उड्डाणाला झालेल्या विलंबाबाबत तो पायलट माहिती देत असतानाच पिवळ्या रंगाची हुडी घातलेला एक प्रवासी उठला आणि त्याने थेट पायलटला ठोसा लगावला.
पायलटवर झालेल्या या हल्ल्यानंतर विमानात चांगलाच गोंधळ उडाला. शेजारीच असलेल्या एअर होस्टेसने या प्रकाराचा विरोध करत पायलटवर हात उचलणाऱ्या प्रवाशाचा चांगलंच सुनावलं.
सोशल मीडियावरही उमटल्या प्रतिक्रिया
पायलटबाबत झालेल्या या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनेही याबाबत आपली मते व्यक्त केली आहेत. एक्सवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओखाली एका युजरने म्हटलं आहे की, "विमान उड्डाणाला झालेल्या उशिरामध्ये पायलट किंवा केबिन क्रूची काय चूक आहे? ते तर फक्त आपली ड्युटी करत आहेत. पायलटवर हात उचलणाऱ्या प्रवाशाला अटक करा आणि नो-फ्लाय यादीत टाका."