अयोध्या : रामजन्मभूमी वादाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाने अयोध्येमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी रविवारी सकाळपासून भाविकांची रीघ लागली होती. या शहरातील हनुमानगढी, नया घाट परिसरातील मंदिरात भाविक मोठ्या संख्येने देवदर्शनासाठी आले होते. रिकबगंज व शहरातील अन्य भागांतील रहिवासी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबाबत रविवारी सकाळी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या बारकाईने वाचताना व त्यावर चर्चा करताना दिसून आले. अयोध्येतील एका हॉटेलमधील मॅनेजर संदीपसिंह यांनी सांगितले की, अयोध्यावासीयांसाठी निकालानंतरचा रविवार वेगळा आहे. अनेक वर्षे प्रलंबित राहिलेला प्रश्न सुटल्याने अयोध्यावासीयांना हायसे वाटले आहे. हनुमानगढी येथील मिठाई व पुष्पहार दुकानाचे मालक अनुप सैनी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडणार हे लक्षात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या दोन दिवस आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दूरध्वनी करून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासंदर्भात चर्चा केली होती. निकालानंतर राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडल्यास तत्काळ केंद्र सरकारला कळवा असे शहा यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.>९० जणांना अटकसर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर दक्षतेचा उपाय म्हणून आतापर्यंत ९० लोकांना अटक तसेच समाजमाध्यमांवरील ८ हजारांहून अधिक आक्षेपार्ह पोस्टविरोधात कारवाई केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये शनिवारपासून ७७ लोकांना अटक झाली आहे. त्यात या राज्यात रविवारी ताब्यात घेतलेल्या ४० लोकांचा समावेश आहे. सोशल मिडियवरील ८२७५ आक्षेपार्ह पोस्टविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे.>अनुचित प्रकार नाहीअयोध्येत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बाराबंकी, आझमगढ, आंबेडकर नगर व लखनऊला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही सुरळीत सुरू आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त अयोध्येत रविवारी काढण्यात येणारी मिरवणूक रद्द करण्यात आली.
अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी झुंबड; निकालामुळे आनंदाचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 6:06 AM