Gujarat Flood Updates: गुजरातमध्ये (Gujarat) जोरदार पावसामुळे जामनगरसह अनेक भागांत पुराचे पाणी घुसले आहे. यामुळे शहरातील कार, वाहने वाहून गेली असून घरे-दुकाने बुडाली आहेत. रेस्क्यू ऑपरेशनसाठी हेलिकॉप्टर बोलवावी लागली आहेत. (Heavy Rain In Gujrat Resulted flood in Jamnagar, Rajkot, Junagadh.)
गुजरातच्या जामनगर, राजकोट आणि जुनागढमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे या भागात पुराने थैमान घातले आहे. सर्वाधिक पुराचा फटका हा जामनगरला बसला आहे. 35 गावांचा संपर्क तुटला असून एनडीआरएफच्या सहा टीम, हवाई दलाचे 6 हेलिकॉप्टर बचाव कार्यात उतरले आहेत. पुरात अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.
सततच्या पावसामुळे जामनगरच्या परिसरातील वेगवेगळे 18 बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. घरांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आले आहे. पुरापासून वाचण्यासाठी अनेकांनी छतावर आसरा घेतला आहे. NDRF ची टीम घरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढत आहे. जामनगरच्या आजुबाजुच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे आजुबाजुच्या गावातील लोकांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
पुढील 4-5 दिवस धोक्याचे...पावसामुळे राजकोटची परिस्थितीही धोक्याची बनली आहे. रस्सीच्या साह्याने पाण्यातून लोकांना वाचविले जात आहे. आयएमडीने पुढील 4-5 दिवस गुजरातमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. जामनगर, जुनागढ, पोरबंदर, द्वारका, ओखा, राजकोटच्या किनारी भागात 40-50 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्य़ात आला आहे.