बिहारमधील सासाराम शहरात शनिवारी एक विचित्र घटना घडली. मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या मुरादाबादजवळील कालव्यातून मोठ्या प्रमाणात नोटा मिळत असल्याची माहिती मिळाली. शनिवारी अचानक लोकांना समजलं की, मुरादाबादच्या कालव्यात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम टाकण्यात आली आहे. माहिती मिळताच नोटा लुटण्यासाठी गर्दी झाली होती. आजूबाजूचे लोक पाण्यात उतरले आणि नोटांचे बंडल घेऊन पळू लागले. बहुतेक 10 आणि 100 च्या नोटा असल्याचं सांगितलं जात होतं.
नोटा लुटण्याचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला. व्हिडीओ पाहून लोकांची मोठी गर्दी झाली. माहिती मिळताच मुफस्सिल पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी पोहोचले. नोटांचे बंडल वाहताना पाहून लोकांना आश्चर्य वाटले. पहाटे नोटांचे बंडले पाण्यात तरंगताना दिसल्यानंतर आजूबाजूचे लोक पाण्यात उतरले आणि पैसे लुटण्यास सुरुवात केली, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. ही रोख रक्कम कुठून आली असा प्रश्न उपस्थित होत आहे. या नोटा खऱ्या आहेत की खोट्या? हे अद्याप समजलेले नाही. हे सर्व तपासानंतरच कळू शकेल.
जमा करण्यासाठी मोठी गर्दी
सध्या या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जमावाला पांगवलं. प्रत्यक्षदर्शी पवन कुमार आणि अक्षय कुमार यांनी सांगितले की, बहुतांश नोटा पाण्यात गेल्याने ओल्या झाल्या होत्या. नोटांचे बंडल दोरीने बांधलेले होते. बांधलेल्या बहुतेक नोटा 10 च्या होत्या. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी बंडल उचलून आपापल्या घरी नेले आणि उन्हात वाळवायला सुरुवात केली. या गोंधळात नोटांचे बंडलही विखुरले.
पोलीस म्हणतात....
ही अफवाही असू शकते, पण तपासानंतरच काही सांगता येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस सर्व मुद्यांवर तपास करत आहेत. मुफस्सिल पोलीस स्टेशनचे अध्यक्ष रिजवान खान सांगतात की, मुरादाबाद पुलाजवळ गोंधळ झाल्याची माहिती आली होती. माहितीवरून ते एका टीमसह पोहोचले. त्यांनी सांगितले की, काही लोकांनी पैसे पाण्यात विखुरल्याचे सांगितले आहे, परंतु ही अफवा देखील असू शकते. याचा तपास सुरू असून त्यानंतरच काही सांगता येईल.
पैशांचे बंडल आले कुठून?
एवढी मोठी रक्कम कशी कालव्यात फेकली गेली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. हे तपासानंतरच स्पष्ट होईल. मात्र कालव्यात सर्व पैशांचे बंडल आले कुठून? हे कोडं आहे. लोकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत. हा पैसा कोणत्यातरी नेत्याचा असल्याची चर्चा काही लोक करत आहेत, त्यांनी ईडीचे छापे टाळण्यासाठी फेकून दिले आहेत. किंवा तो काळा पैसाही असू शकतो असं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.