दिल्लीत मुसळधार पावसामुळे यमुना नदीच्या पाण्याची पातळी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. मात्र आता हळूहळू यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत घट होताना दिसत आहे. असे असतानाही अनेक भागात पाणी आहे. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून सखल भागात राहणाऱ्या लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पाणी साचल्याने अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत.
पूरपरिस्थितीमुळे लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्यासाठी, खाणं-पिणं, झोपणं आणि त्यांचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. पूरग्रस्त मुली व महिला रडत रडत आपली परिस्थिती सांगत आहेत. एका महिलेने सांगितलें की, पूर आल्यापासून तिला आंघोळ करता आली नाही. सगळं वाहून गेले, आता काय करायचे? आठ दिवसांपासून आंघोळ केली नसल्याचे काही महिला सांगत आहेत.
दुसरीकडे, आपल्या व्यथा सांगताना आणखी एका महिलेने सांगितले की, तिने आपल्या मुलीच्या हुंड्यासाठी जमा केलेल्या सर्व वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. आता सरकारने त्याची भरपाई करावी, अशी मागणी आहे. पुराच्या पाण्यामुळे इतर गोष्टी जसेच्या तसे सुरू आहेत, मात्र शौचालयात जाणे, आंघोळ करण्यात खूप अडचणी येत असल्याचे महिलेने सांगितले.
शाळेतील वह्या आणि पुस्तकं पुरात वाहून गेल्याचे मुलींचे म्हणणे आहे. टॉयलेटला जाताना मुलं फ्लर्ट करत आहेत. यावरून हाणामारी देखील झाली. एका व्यक्तीने पुरामुळे आमचा अडीच लाखांचा माल वाया गेला, आता सरकारने नुकसान भरपाई द्यावी असं म्हटलं आहे. एनडीटीव्ही इंडियाने याबाबातचे वृत्त दिले आहे.