गंगटोक : सिक्कीममध्ये ३ ऑक्टोबर रोजी ढगफुटीनंतर आलेल्या तिस्ता नदीच्या पुरात मृतांची संख्या शुक्रवारी २१वर पोहोचली. पुरामुळे परिस्थिती गंभीर झाली असून, तब्बल ७००० जण त्यात अडकल्याचे वृत्त आहे. हवाई दलाचे हेलिकॉप्टर बचावकार्य करत आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुख्यमंत्री पी. एस. तामांग यांनी गुरुवारी सांगितले की, बुरदांग परिसरातून बेपत्ता झालेल्या २३ पैकी ७ लष्करी जवानांचे मृतदेह नदीच्या खालच्या भागातून बाहेर काढण्यात आले आहेत. बेपत्ता झालेल्या जवानांपैकी एकाची सुटका करण्यात आली. १५ जवानांसह एकूण ११८ लोक अजूनही बेपत्ता आहेत.
धरण १० सेकंदांत कोसळले
नेपाळमधील भूकंपामुळे सिक्कीमचे ल्होनक सरोवर फुटले, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे ढगफुटीनंतर तिस्ता नदीला पूर आला. नदीच्या पाण्याची पातळी १५ ते २० फुटांनी वाढली. नदीलगतच्या परिसरात असलेली लष्कराची छावणी पुरात वाहून गेली आणि तेथे उभी असलेली ४१ वाहने बुडाली. केवळ १० सेकंदात, १३००० कोटी रुपयांच्या तीस्ता-३ जलविद्युत प्रकल्पातील ६० मीटर उंच धरण पुरात पूर्णपणे वाहून गेले.
वाहून आलेल्या तोफगोळ्याचा स्फोट
पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यातील तिस्ता नदीच्या पुराच्या पाण्यात तोफगोळ्याचा स्फोट होऊन किमान दोनजण ठार, तर चारजण जखमी झाले आहेत. बुधवारी सिक्कीमहून पुराच्या पाण्याने येथे आला. एका माणसाने तो घरी नेत तोडण्याचा प्रयत्न केला आणि स्फोट झाला.
पूरग्रस्त सिक्कीमला ४४.८ कोटींची मदत
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून पूरग्रस्त सिक्किमला ४४.८ कोटीची आगाऊ रक्कम पूरग्रस्तांना मदतीसाठी मंजुरी केली. शाह यांच्या निर्देशानुसार, गृह मंत्रालयाने नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी आंतर-मंत्रालयीय केंद्रीय पथक स्थापन केले आहे.