पठाणकोट - जिल्ह्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्याने पठाणकोट एअरपोर्टकडे जाणारा प्रमुख रस्ता नदीच्या प्रवाहाच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे, येथून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांची आणि नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. येथील चक्की नदीला पूर आल्यानंतर नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगवान आणि तीव्र होता. या प्रवाहात विमानतळाकडे जाणारा मुख्य रस्ताच वाहून गेला. यासंदर्भात पठाणकोटचे सहआयुक्त हरबीर सिंग यांनी हिमाचल सरकारला अवगत केलं आहे. तसेच, लवकरात लवकर हा मार्ग बनवून घेण्याची विनंतीही केली आहे.
पठाणकोट हा प्रदेश पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमारेषेवर येतो. तर, एअरपोर्टकडे जाणारा वाहून गेलेला रस्त्याचा प्रदेश हिमाचल सरकारच्या अंतर्गत येतो. त्यामुळे, या वाहून गेलेल्या रस्त्यासंदर्भात आणि हिमाचल सरकारला माहिती दिली आहे. तसेच, या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्याचेही सूचवले आहे. त्यानंतर, हिमाचल प्रदेश सरकारने रस्ता दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतल्याचे सहआयुक्त हरबीर सिंग यांनी सांगितले.