यमुनानगर : हरियाणाच्या उत्तरेकडील जिल्ह्यांत मागील दोन दिवसांपासून तुफान पाऊस पडत असून, यमुनानगर व अंबाला जिल्ह्यांत, तसेच कुरुक्षेत्र व पानिपतच्या अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. घराचे छत कोसळून दोन अल्पवयीन भावांचा मृत्यू झाला.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांमध्ये अंबालामध्ये १२७ मि.मी., कुरुक्षेत्रमध्ये १२० मि.मी. व यमुनानगरमध्ये १०२ मि.मी. पाऊस पडला. या पावसामुळे यमुनानगर, जगध्री, राडौर व सरस्वतीनगरसारख्या काही भागांमध्ये अनेक वसाहती व कार्यालये पाण्याखाली गेली आहेत. नागरिकांना आपली घरे सुरक्षित ठेवण्यासाठी झगडावे लागत आहे. हजारो एकरवरील पिके व भाजीपाला पाण्याखाली गेला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांनाही पिकांचे नुकसान होण्याची भीती वाटत आहे. यमुनानगर जिल्ह्यातील एका शेतकºयाने सांगितले की, पिके पाण्याखाली गेली आहेत व जागोजागी पाणी साचल्यामुळे पाळीव प्राण्यांना चारा देणे अवघड झाले आहे.तुफान पावसामुळे घराचे छत कोसळून दोन अल्पवयीन भाऊ मृत्युमुखी पडले. यमुनानगर जिल्ह्यातील सारन गावात ही दुर्घटना घडली. हे दोघेही घरात झोपलेले असताना हा प्रकार घडला.हरियाणा कृषी विभागाचे उपसंचालक सुरेंद्र यादव यांनी सांगितले की, सध्या तरी पिके नष्ट झाल्याचे अहवाल प्राप्त नाहीत. मात्र, सध्या अनेक भागांमध्ये पाणी साचलेले असल्यामुळे आगामी काही काळात पिके धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, पुढील चार दिवसांत यमुनानगर, अंबाला, कैथल, कुरुक्षेत्र व पंचकुला जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)
यमुनानगर, अंबालामध्ये तुफान पावसामुळे पूरस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 4:50 AM