वडोदरा : मुसळधार पावसानंतर विश्वामित्री नदीच्या जलस्तरात झालेल्या वाढीमुळे वडोदरा येथे पूरस्थिती निर्माण झाली असून जलमय भागातील नागरिकांच्या सुटकेसाठी व त्यांना मदत पुरविण्यासाठी प्रशासनाने लष्कराची मदत मागितली आहे.वडोदराचे आयुक्त मनीष भारद्वाज यांनी पूरग्रस्त भागातील नागरिकांना खाद्यान्नाची पाकिटे, पेयजलाच्या बाटल्या पुरविण्यासाठी लष्कराला पाचारण केल्याचे सांगितले. शहराच्या अनेक भागात पाणी शिरल्याने त्यांच्यापर्यंत मदत पोहचविणे कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले. वडोदरा नगर परिषदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हितेंद्र पटेल यांनी, शहराच्या पश्चिम भागात असलेल्या वस्त्यांमध्ये सर्वात जास्त पाणी शिरले असून त्यामुळे दोन लाखाहून अधिक लोक अडकले असल्याची माहिती दिली. प्रशासनाने या भागातील १५०० नागरिकांना मंगळवारी तर बुधवारी २०० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचविले आहे. (वृत्तसंस्था)
वडोदरात पूरस्थिती : लष्कराला पाचारण
By admin | Published: September 11, 2014 1:44 AM