केरळ, कर्नाटकात पुरामुळे ६ लाख लोकांचे स्थलांतर, ५0 लोक बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 04:06 AM2019-08-13T04:06:45+5:302019-08-13T04:07:06+5:30

केरळच्या काही भागांतील पुराचे पाणी ओसरू लागले आहे. मलप्पुरम तथा वायनाडमध्ये भूस्खलनामुळे कवलप्परा आणि पुथुमाला भागात मदतकार्य सुरूच आहे.

Floods : 5 lakh people Shifted in Safe place in Kerala & Karnataka, 50 missing | केरळ, कर्नाटकात पुरामुळे ६ लाख लोकांचे स्थलांतर, ५0 लोक बेपत्ता

केरळ, कर्नाटकात पुरामुळे ६ लाख लोकांचे स्थलांतर, ५0 लोक बेपत्ता

googlenewsNext

तिरुवनंतपुरम/बंगळुरू : केरळच्या काही भागांतील पुराचे पाणी ओसरू लागले आहे. मलप्पुरम तथा वायनाडमध्ये भूस्खलनामुळे कवलप्परा आणि पुथुमाला भागात मदतकार्य सुरूच आहे. केरळ, कर्नाटकात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या वाढून १२३ झाली आहे, तर ६ लाख लोकांनी मदत शिबिरात आश्रय घेतलेला आहे.

केरळात ५८ व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहेत. यातील ५० लोक मलप्पुरमचे आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांंधी हे पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी केरळमध्ये आलेले आहेत. सोमवारी सकाळी त्यांनी वायनाडच्या तिरुवम्बाडीमध्ये एका शिबिरात पाहणी केली. या ठिकाणी लोकांशी संवाद साधताना ते म्हणाले की, संकटाच्या काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत. पूरग्रस्त लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन त्यांनी काँग्रेस आणि यूडीएफच्या कार्यकर्त्यांना केले. ते म्हणाले की, आज सण असूनही आनंदाचे वातावरण नाही. तरीही मी आपणास ईदच्या शुभेच्छा देतो.

मध्य भारत, केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
बंगालच्या उत्तर पश्चिम उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे मध्य भारतात आणि केरळच्या काही भागांत आगामी दोन दिवसांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राहुल गांधी यांचे मदत साहित्य देण्याचे आवाहन


वायनाड : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी नागरिकांना आवाहन केले की, वायनाडमधील पूरग्रस्त लोकांना जीवनावश्यक साहित्याची मदत करावी. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली असून, यात म्हटले आहे की, वायनाडमध्ये पुराने मोठे नुकसान झाले आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. त्यांना शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. या लोकांना तात्काळ पाणी बॉटल, चटई, चादरी, कपडे, चप्पल, साबण, टूथब्रश, ब्लिचिंग पावडर आदींची गरज आहे. लोकांनी बिस्किट, साखर, मूग डाळ, हरभरा डाळ, नारळाचे तेल, भाज्या, ब्रेड आणि मुलांसाठी खाण्याचे पदार्थ द्यावेत, असे आवाहन केले आहे.

मृत्यूनंतरही त्यांचे हातात घट्ट होते हात
मलप्पुरम : आई आपल्या मुलावर किती प्रेम करते? त्याच्यासाठी ती काय काय नाही करीत? पण, जेव्हा मृत्यू समोर दिसू लागला आणि त्यातून सुटका होण्याची शक्यताही धूसर झाली तेव्हा या माऊलीने आपल्या दीड वर्षाच्या लेकराचा हात हातात घट्ट धरला.
कदाचित काळाच्या तावडीतून हा कोवळा जीव तरी वाचावा हीच तिची अपेक्षा असेल; पण नियतीला काही वेगळंच करायचं होतं... मलप्पुरममध्ये मदतकार्यात भूस्खलनाच्या ठिकाणाहून गीतू (२१) या महिलेचा आणि तिच्या दीड वर्षाच्या धु्रव या मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या मातेने आपल्या चिमुरड्याचा हात हातात घट्ट पकडला होता.
अगदी मृत्यूनंतरही हाताची ही पकड तशीच होती. स्थानिक लोकांनी हे दृश्य पाहिले तेव्हा अनेकांना अश्रू अनावर झाले.
या दुर्घटनेत महिलेचा पती सरत बचावला आहे; पण यात आईचाही मृत्यू झाला आहे. पत्नी, मुलगा आणि आईच्या जाण्याने सरत यांना मोठा धक्का बसला आहे.

कर्नाटकमध्ये 40 जणांचा बळी
कर्नाटकात पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये मृृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या ४० वर पोहोचली असून, १४ नागरिक बेपत्ता आहेत. आतापर्यंत पुरात फसलेल्या ५ लाख ८१ हजार लोकांना बाहेर काढण्यात आले आहे, तर ११६८ शिबिरांत ३,२७,३५४ लोकांनी आश्रय घेतला आहे. राज्यात मदतकार्य वेगाने सुरू असून, पाऊस थांबल्याने पाणी ओसरू लागले आहे. ४ ते ५ दिवसांत परिस्थितीत सुधारणा होईल, असे मत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केले, तर केंद्राकडून 3000 कोटी रुपयांची तात्काळ मदत राज्य सरकारने मागितली.

माय-लेकीसह भूस्खलनात सहा जण ठार
डेहराडून : उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनांत मुसळधार पावसानंतरच्या भूस्खलन आणि पुराच्या दुर्घटनेत माय-लेकीसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तीन लोक ढिगाऱ्याखाली दबले असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. चमोली जिल्ह्यात पहाडी भागात सोमवारी ही दुर्घटना घडली. भूस्खलनात रूपा देवी आणि त्यांची ९ महिन्यांची मुलगी चंदा दबल्या गेल्या. यातच त्यांचा मृत्यू झाला. या घरातील ४० शेळ्या आणि दोन बैलही ढिगाºयाखाली दबले असल्याची शक्यता आहे.




 

Web Title: Floods : 5 lakh people Shifted in Safe place in Kerala & Karnataka, 50 missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.