श्रीनगर/जम्मू : जम्मू-काश्मिरात सहा दशकानंतर प्रत्ययास आलेल्या महापुराचा कहर सुरूच असून पुरात अडकलेल्या हजारो लोकांना बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलविण्याचे आणि त्यांना मदत पोहोचविण्याचे कार्य युद्धपातळीवर केले जात आहे. श्रीनगरचा बहुतांश भाग अद्यापही पाण्याखाली आहे आणि विस्कळीत झालेली दूरसंचार सेवा आणि वाढलेली पाण्याची पातळी यामुळे मदतकार्यात कमालीच्या अडचणी येत आहेत. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत दीडशेच्यावर लोकांचा बळी गेला आहे.प्रशासन आपल्या सर्व शक्तिनिशी या नैसर्गिक आपत्तीशी लढत असतानाच अनेक भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि दरडी कोसळण्याच्या घटनाही घडतच आहे. उधमपूर जिल्ह्याच्या पाचोरी येथे सोमवारी भूस्खलन झाल्याचे वृत्त आहे.श्रीनगर येथे पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी २५ बोटी सेवारत आहेत. आतापर्यंत ५२00 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. अंदाजे दीडशे लोकांचा बळी घेणार्या या आपत्तीमुळे अनेक इमारती, रुग्णालये आणि पूल कोसळले आहेत आणि वाहतूक व दळणवळण सेवा ठप्प पडल्याने अनेक भागांचा संपर्क तुटला आहे. श्रीनगरमधील आर्मी कन्टोनमेंट, मुलकी सचिवालय आणि हायकोर्टाच्या इमारतीतही पाणी घुसले आहे.
जम्मू-काश्मिरातील पूरस्थिती गंभीर; युद्धपातळीवर मदतकार्य सुरू
By admin | Published: September 09, 2014 4:31 AM