पाटणा/ लखनौ : बिहारमधील पुराचा फटका २७.५० लाख लोकांना बसला असून राज्याच्या १२ जिल्ह्यांत अजूनही पूरस्थिती गंभीरच आहे. उत्तर प्रदेशात अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहात आहेत. बिहारमध्ये पुराने २६ जणांचा बळी घेतला. १२ जिल्ह्यांत नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. २०० लाख हेक्टरवर २७.५० लाख लोकांना या पुराचा फटका बसला आहे, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने निवेदनात सांगितले. लखनौमध्ये पूरसदृश्य परिस्थितीउत्तर प्रदेशात सततधार पावसामुळे गंगेसह अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहात असल्यामुळे अनेक खेड्यांत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय जल आयोगाने शारदा नदीचे पाणी सतत वाढत असून पालिया येथे ती धोक्याच्या पातळीवरून वाहात आहे, असे सांगितले. अयोध्येतील तुरतीपर आणि एल्जिन ब्रिज येथे घागरा नदी सतत धोक्याच्या पातळीवरून वाहात आहे. रापती नदी बलरामपूर, बन्सी, रिगाऊली, बिर्द घाट (गोरखपूर) येथे धोक्याच्या पातळीवरून वाहात आहे. गंगा नदीचे पाणी फतेहगढ, कनौज आणि कानपूर धोक्याच्या पातळीजवळ आले आहे. (वृत्तसंस्था)
पुराचा २७.५० लाख लोकांना फटका
By admin | Published: August 01, 2016 1:44 AM