पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात ममता यांनी राज्यात पुरामुळे झालेल्या प्रचंड विध्वंसाचा सामना करण्यासाठी केंद्राकडून निधी तातडीने जारी करण्याची विनंती केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देखील ममता यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "डीव्हीसी (दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन) च्या मालकीच्या मॅथॉन आणि पंचेत धरणांतून सुमारे ५ लाख क्युसेक पाणी सोडण्यात आलं. इतकं पाणी सोडल्यामुळे दक्षिण बंगालमधील सर्व जिल्हे म्हणजेच पूर्व बर्धमान, पश्चिम बर्धमान, बांकुरा, हावडा, हुगळी, पूर्व मेदिनीपूर आणि पश्चिम मेदिनीपूर मोठ्या समस्यांना तोंड देत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी कधीच सोडण्यात आलं नव्हतं."
"२००९ नंतरचा सर्वात मोठा पूर"
"राज्य सध्या २००९ नंतरच्या सर्वात मोठ्या पुराचा सामना करत आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करा आणि संबंधित मंत्रालयांना या समस्या लवकर सोडवण्यासंबंधित महत्त्वाच्या सूचना द्या." ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात पुढे म्हटलं आहे की, "मी याला मानवनिर्मित पूर म्हणत आहे कारण ही परिस्थिती नीट माहिती न घेतल्यामुळे निर्माण झाली आहे."
"पुरामुळे रस्त्यांचं मोठं नुकसान"
"पुराच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि ग्रामीण भागातील रस्त्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मी गेल्या दोन दिवसांतील पूरग्रस्त भागाच्या भेटी दरम्यान हे पाहिलं आहे. राज्य सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून DVC अधिकाऱ्यांना आधीच धोक्याच्या पातळीच्या जवळ किंवा वर वाहणाऱ्या नद्यांच्या अशा गंभीर स्थितीबद्दल माहिती दिली होती" असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.