Kerala Floods : बीफ फेस्टिव्हलमुळे केरळमध्ये महाप्रलय, भाजपा आमदाराचे वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 04:29 PM2018-08-26T16:29:48+5:302018-08-26T16:36:21+5:30
कर्नाटकातील भाजपाचे आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यत्नाळ आता केरळमध्ये आलेल्या महाप्रलयासंदर्भात वादग्रस्त विधान केल्यानं नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली - कर्नाटकातील भाजपाचे आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री बसनगौडा पाटील यत्नाळ आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी आता केरळमध्ये आलेल्या महाप्रलयासंदर्भात वादग्रस्त विधान केल्यानं नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 'केरळमधील लोक बीफ खातात त्यामुळेच तिथे पूर आला, असे वादग्रस्त विधान पाटील यांनी केले आहे.
पाटील असं म्हणाले की, 'हिंदूंच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न झाला, तर धर्म त्यांना शिक्षा देईल. केरळमध्ये जे झाले आहे, ते याचे उदाहरण आहे. केरळला देवभूमी म्हटले जाते. पण येथे उघडपणे गोहत्या होतात.
केंद्र सरकारकडून पशू बाजारात जनावरे खरेदी-विक्रीवर बंदी आणल्यानंतर याचा विरोध दर्शवण्यासाठी जूनमध्ये केरळ काँग्रेसनं विधानसभेत बीफ फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. या फेस्टिव्हलच्या वर्षभराच्या आतच राज्यामध्ये पूर आला.
दरम्यान, बीएस येडियुरप्पा पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा दावाही त्यांनी यावेळेस केला आहे. पुढे ते असंही म्हणाले की, जेव्हा भाजपा सत्तेत येईल, तेव्हा आम्ही गोमांसावर बंदी घालू. तर दुसरीकडे त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांच्यावरही हल्लाबोल चढवला. पूरग्रस्तांना मदत करण्याऐवजी कुमारस्वामी मंदिर-मशिदींमध्ये पळताहेत, अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.