डेहराडून : हिमनद्या वितळून त्यामुळे येणाऱ्या महापुरांचा उत्तराखंडमधील एक तृतियांश तालुक्यांना गंभीर धोका आहे. त्यात नुकतीच महापुराची भीषण दुर्घटना घडलेल्या चमोलीचाही समावेश आहे.हिमालय पर्वतराजीतील भारतीय हद्दीतल्या पाच हजार हिमतलावांचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनी हा निष्कर्ष काढला. त्यातील ५०० हिमतलाव उत्तराखंडच्या हद्दीत आहेत. हिमनद्या वितळल्याने या तलावातील पाण्याची पातळी प्रचंड वाढेल. त्यातून उत्तराखंडमधील नद्यांना महापूर येण्याची शक्यता आहे.हिमकडा कोसळून चमोलीमध्ये दि. ७ फेब्रुवारी रोजी नद्यांना आलेल्या महापुरात शेकडो लोक बेपत्ता झाले. तपोवन परिसरात नव्याने बांधलेली धरणे तसेच दोन जलविद्युत प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील पर्यावरण विज्ञान या विषयाचे प्राध्यापक ए. पी. दिमरी यांनी सांगितले की, भविष्यातही हिमनद्या वितळून येणाऱ्या महापुरांचा तडाखा उत्तराखंडमधील ७८ पैकी २६ तालुक्यांना बसेल. या राज्यातील आणखी काही नवी ठिकाणेही महापुराच्या विळख्यात सापडू शकतील. उत्तराखंडमध्ये आवश्यकता नसताना नदीपात्र अडवून तिथे धरणे बांधली जात आहेत. पर्यावरणाची मोठी हानी होत असल्याची टीका तपोवन येथील दुर्घटनेनंतर पर्यावरण तज्ज्ञांनी केली होती. (वृत्तसंस्था)
जोशीमठ, धारचुलामध्ये सर्वाधिक दक्षताउत्तराखंडमध्ये महापुराचा सर्वांत जास्त धोका जोशीमठ, धारचुला, भटवारी या भागांना आहे. हिमालयाच्या कुशीत देशातील ११ राज्ये वसलेली असून, त्यांच्यात उत्तराखंडमध्ये लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे.
पथकाने तपाेवनमधील बाेगद्याला पाडले छिद्रउत्तराखंडमध्ये हिमकडा काेसळल्यानंतर वाहून गेलेल्या तपाेवन जलविद्युत प्रकल्पातील बाेगद्यात अद्यापही ३० हून अधिक जण अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, बचाव पथकाने बाेगद्यावर ड्रील करून छिद्र पाडले आहे.