भोपाळ : आमदारांनी बंडखोरी करून राजीनामे दिल्याने मध्य प्रदेशमधील कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे सरकार अडचणीत आले आहे. दरम्यान, राज्याचे राज्यपाल लालजी टंडन यांनी कमलनाथ सरकारला 16 मार्च रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. तर विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यासाठी काँग्रेस पूर्णपणे तयार असल्याचा दावा काँग्रेस नेते हरिश रावत यांनी केला आहे.
भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हरिश रावत म्हणाले की, मध्य प्रदेश विधानसभेतील बहुमत चाचणीसाठी काँग्रेस पूर्णपणे तयार आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता वाटत नाही. उलट भाजपच तणावात असल्याचे ते म्हणाले. तर बंडखोर आमदार सुद्धा आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला त्यांनी यावेळी केला.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा सोडचिठ्ठी दिल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला असून, शिंदेंचे समर्थक असलेल्या अनेक मंत्री आणि आमदारांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यातील कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे. सोमवारी 16 मार्च रोजी कमलनाथ यांच्या सरकारचे भवितव्य निश्चित होणार आहे.
मध्य प्रदेश विधानसभेत एकूण २३० जागा आहेत. यामध्ये काँग्रेसचे ११४ तर भाजपचे १०९ आमदार आहेत. तर समाजवादी पक्षाचा एक, बसपाचे दोन आणि चार अपक्ष आमदार आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामे दिले होते.