मोरबी : गुजरातमधील मोरबी येथील झुलत्या पुलाची दुरुस्ती करणारे कंत्राटदार अशी कामे करण्यास पात्र नव्हते, असे फिर्यादी पक्षाने येथील न्यायालयात सांगितले. पुलाचा पृष्ठभाग (फ्लोरिंग) बदलण्यात आला; परंतु केबल बदलण्यात आली नाही. ही जुनाट केबल ॲल्युमिनियम पत्र्याच्या तारापासून बनविलेल्या नव्या पृष्ठभागाचे वजन सहन करू शकली नाही, असे फिर्यादी पक्षाने फॉरेन्सिक अहवालाचा हवाला देत, मंगळवारी दंडाधिकारी न्यायालयात सांगितले.
रविवारी पूल कोसळून १३५ जणांचा बळी गेला. मुख्य न्यायदंडाधिकारी एम. जे. खान यांनी अटक केलेल्या ओरेवा ग्रुपच्या दोन व्यवस्थापक व दुरुस्ती करणाऱ्या दोन उपकंत्राटदारांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी कोठडीची मागणी न केल्यामुळे न्यायालयाने सुरक्षारक्षक आणि तिकीट बुकिंग क्लर्कसह अटक केलेल्या पाच जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवले, असे सरकारी वकील एच. एस. पांचाळ यांनी न्यायालयात सांगितले.