७ वर्षांपासून भाजपच्या तिजोरीत देणग्यांचा ओघ; भाजप ७८५ कोटी, काँग्रेस १३९ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 05:54 AM2021-06-11T05:54:14+5:302021-06-11T05:54:55+5:30
BJP : केंद्र आणि अनेक राज्यांतील सत्ताधारी पक्षाला सर्वाधिक देणगी देणाऱ्या दिल्लीच्या प्रुडेंट इलेक्टोरल ट्रस्टकडून २१७.७५ कोटी रुपये मिळाले.
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : सलग सात वर्षांपासून देणग्यांच्या वाढत्या ओघाने भाजपची तिजोरी ओसंडत आहे. २०१९-२० मध्ये भाजपला ७८५ कोटी रुपयांहून अधिक देणग्या मिळाल्या आहेत. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांपैकी अधिक रक्कम निवडणूक विश्वस्त कंपन्यांमार्फत (इलेक्टोरल ट्रस्ट) मिळाल्या. भाजपला सर्वाधिक देणग्या देणाऱ्यांत महाराष्ट्रातील अनेक कंपन्यांचा समावेश आहे.
केंद्र आणि अनेक राज्यांतील सत्ताधारी पक्षाला सर्वाधिक देणगी देणाऱ्या दिल्लीच्या प्रुडेंट इलेक्टोरल ट्रस्टकडून २१७.७५ कोटी रुपये मिळाले. आयटीसीकडून ७६ कोटी, मुंबईच्या जनकल्याण इलेक्टोरल ट्रस्टकडून ४६ कोटी आणि न्यू डेमॉक्रॅटिक इलेक्टोरल ट्रस्टकडून ३० कोटी रुपयांची देणगी मिळाली. याशिवाय भाजपचे खासदार राजीव चंद्रेशखर यांच्या ज्युपिटर कॅपिटलने पक्षाला १५ कोटी रुपयांची देणगी दिली. भाजपला देणग्या देण्यात शैक्षिणक संस्थाही मागे नाहीत. अशा १४ संस्था आणि विद्यापीठांची नावे यादीत समाविष्ट आहेत. दिल्लीच्या मेवाड विद्यापीठाने २ कोटी, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगने १० लाख, सुरतच्या जी. डी. गोयंका इंटरनॅशलन स्कूलने २.५ लाख, रोहतकच्या पठानिया पब्लिक स्कूलने २.५ लाख आणि कोटा येथील एका कोचिंग सेंटरने २५ लाख रुपयांची देणगी दिली आहे.
राज्यसभेतील भाजपचे सदस्य राजीव चंद्रशेखर यांनी २ कोटी, खासदार किरण खेर यांनी ६.८ लाख रुपये आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ५ लाख रुपये दिले.
कोणत्या पक्षाला किती देणगी?
- महाराष्ट्रातील सत्तारूढ महाविकास आघाडीतील शिवसेनेला १८.६१ कोटी, राष्ट्रवादी काँग्रेसला ५९ कोटी रुपयांची देणगी मिळाल्याची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. याशिवाय काँग्रेसला १३९ कोटी रुपयांची देणगी मिळाली.
- बहुजन समाज पार्टीने निवडणूक दिलेल्या माहितीत नमूद केले आहे की, पक्षाला २० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेत देणगी मिळालेली नाही.